

पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्ग म्हणजेच HCMTR प्रकल्पाला आता वेग देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तब्बल 3000 कोटी रुपयांची गरज असून, त्यापैकी 1500 कोटी रुपये पुणे महापालिकेच्या मुदत ठेवींमधून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. या बैठकीत HCMTR, तळजाई ते हिंगणे बोगदा, पाषाण ते पंचवटी बोगदा आणि इनर रिंग रोड यांसह पुण्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली.
HCMTR प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 3000 कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी 1500 कोटी रुपये महापालिकेच्या मुदत ठेवींमधून वापरण्याचे नियोजन असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले. मात्र, या निधीमुळे महापालिकेच्या इतर विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
"एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी दीड हजार कोटी रुपये महापालिकेच्या मुदत ठेवींमधून वापरण्याचे नियोजन आहे. या निधीच्या वापरामुळे अन्य विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्या," अशी सूचना मिसाळ यांनी केली.
HCMTR साठी खडकी कॅन्टोन्मेंट, संरक्षण विभाग, रेल्वे आणि वन विभागाच्या जमिनींची आवश्यकता आहे. संबंधित परवानग्या मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर बैठका घेण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी डिसेंबर 2026 मध्ये निविदा काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाची प्रत्येक टप्प्यावर प्रगती तपासण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड आणि वॉर रूम तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, तळजाई आणि पंचवटी बोगद्यांच्या कामात पर्यावरणाचा विचार करण्यावरही भर देण्यात आला. जैवविविधतेला कोणतीही हानी होणार नाही, यासाठी पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इनर रिंग रोडसाठी पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि उरुळी देवाची-फुरसुंगी नगरपरिषद यांनी समन्वयाने काम करण्याचे सांगण्यात आले. HCMTR आणि इतर प्रकल्पांच्या कामामुळे सिंहगड रस्ता, सातारा रस्ता तसेच पाषाण परिसरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक आराखडा तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.