पिंपरी : पुण्यातील मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणे याने गेल्यावर्षी १७ फेब्रुवारीला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटका होताच एक्स्प्रेस वे वर जंगी मिरवणूक काढून मोठी दहशत निर्माण केली होती. गुंडाने सुटकेनंतर मिरवणूक काढण्याचे हे लोण आता पिंपरी-चिंचवडपर्यंत आले आहे. शहरातील सोन्या काळभोर टोळीतील सराईत गुंड व `मोका`तील आऱोपी जीवन अंगद सातपुते (रा. गंगानगर,आकुर्डी)याने जेलमधून सुटका होताच आकुर्डीतील आपल्या एरियात जंगी विजयी बाईक रॅली काढली.
गजा व जीवनच्या मिरवणुकीतील फरक एवढाच की गजाच्या समर्थकांची मोटार,तर जीवनच्या पाठीराख्यांची बाईक रॅली होती. गज्यावर तत्कालीन पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश आणि पुणे पोलिस आय़ुक्त अमिताभ गुप्ता यांनी लागलीच एकामागोमाग असे अनेक गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली. एवढेच नाही, तर गुप्ता यांनी गज्याला एक वर्षासाठी `एमपीडीए`लावून त्याला एका वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धही केले होते. दुसरीकडे, मात्र जीवन याने फक्त जमावबंदी आदेशाचा भंग करून विनापरवाना मिरवणूक काढल्याची तुलनेने अगदी क्षुल्लक कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (निगडी पोलिस ठाणे) केली. त्यामुळे या सराईत गुन्हेगाराची लगचे सुटकाही झाली.
दुसरी धक्कादायक बाब म्हणजे हा गुन्हा १७ जून रोजी घडला. म्हणजे जीवनने त्यादिवशी आपल्या सुटकेनिमित्त बाईक रॅली आपल्या १० ते १५ साथीदारांसह शहरात काढली होती. मात्र, त्यासंदर्भात गुन्हा हा तब्बल ६६ दिवसानंतर या महिन्यात नुकताच (ता.२३) निगडी पोलिसांनी नोंदवला.या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडिय़ात व्हायरल झाल्यावर पोलिसांना जाग आली आणि त्यानंतर त्यांनी ही वरवरची मलमपट्टीची कारवाई केली.म्हणजे सराईत गुंडाने जमावबंदी आदेश लागू असूनही त्याचा भंग करीत मिरवणूक काढल्याचे पोलिसांना कळालेच नव्हते. की माहिती नसल्याचे त्यांनी सोंग केले होते,अशी चर्चा आता सुरु झाली आहे.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे गुन्हा विलंबाने दाखल झाला,तर त्याचे तसे कारण त्यात म्हणजे `एफआयआर`मध्ये नमूद करावे लागते.आकुर्डीच्या मॅटरमध्ये पोलिसांनी विलंबाचे कारण विनाविलंब दाखल असे म्हटले आहे.
`आर्यनमॅन`पोलिस आयुक्त केपींची २० एप्रिल रोजी बदली झाल्यानंतर गुंडाने सुटकेची मिरवणूक काढण्याचे धाडस शहरात केले, हे विशेष. ते असताना त्यांनी झिरो टॉलरन्स मोहिमेत अवैध धंद्यांना चाप लावून गुन्हेगारांत दहशत निर्माण केली होती. ती त्यांच्या बदलीनंतर संपल्याचे जीवनने दाखवून दिले. दुसरीकडे केपींच्या काळात शहराबाहेर गेलेले बेकायदेशीर धंदे पुन्हा शहरात आलेच नाही,तर मोठ्या जोमाने सुरुही झाले आहे. त्यातून नवे आयुक्त अंकुश शिंदे यांचा गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक नसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही,तर त्यांचा आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांवरही तो राहिला नसल्याचे निगडीत दोन महिन्यानंतर नोंद गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.