Pune News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मंडळीकडून विविध उपक्रम घेतले जात आहेत. माजी आमदार जगदीश मुळीक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांनी चर्चा करण्यासाठी व्हिजन पुणे शिखर परिषद उपक्रम घेतला. मात्र, या परिषदेकडे शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच पाठ फिरवली.
पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय करणे गरजेचे आहे. शैक्षणिक, औद्योगिक, बांधकाम यासह विविध क्षेत्रात शहर नक्की कुठे आहे. तसेच येणाऱ्या काळात प्रगती करण्यासाठी नक्की कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यावर चर्चा करण्यासाठी व्हिजन पुणे शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेकडे शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. भाजपचे माजी आमदार तसेच शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा कार्यक्रम घेतला.
दोन दिवसांपूर्वी शहर भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष घाटे यांना माजी आमदार मुळीक यांनी घेतलेल्या ' व्हिजन पुणे शिखर परिषद ' या कार्यक्रमाबद्दल विचारले होते. त्यावेळी हा कार्यक्रम भाजपचा असून त्यामध्ये येणाऱ्या काळात शहराचे व्हिजन ठरविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मुळीक माजी शहराध्यक्ष असल्याने ते जे व्हिजन मांडणार आहेत. ती भाजपचीच भूमिका असणार आहे, असेही घाटे यांनी सांगितले होते.
माजी आमदार मुळीक हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी उपक्रम घेत आहेत. बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर महाराज यांचा सत्संग, महाआरोग्य तपासणी शिबीर असे कार्यक्रम त्यांनी घेतले होते. यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी करत तपासणी शिबिरात सहभाग घेतला होता.
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहराचा विस्तार चारही दिशांना होत आहे. नवीन नवीन भाग पुणे शहराला जोडला जात असल्याने शहराची हद्द वाढली आहे. परिणामी लोकसंख्या देखील वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येला आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. याचे व्हिजन तयार करताना त्यामध्ये कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्याची गरज आहे, यावर चर्चा करण्यासाठी माजी आमदार मुळीक (Jagdish Mulik) यांनी हा कार्यक्रम घेतला होता.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होते. तसेच या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार, माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, माजी सभागृह नेते यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी हे उपस्थित राहणे अपेक्षित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपटे रोडवरील हॉटेल रामी ग्रँड येथे ही परिषद झाली. मात्र, या कार्यक्रमासाठी आमदार माजी नगरसेवक यांच्यासह भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून आले.पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri misal) , भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे वगळता इतर कोणतेही पदाधिकारी या परिषदेसाठी न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, 'व्हिजन पुणे शिखर परिषद' ही शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसाठी घेण्यात आली होती. त्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, हे बंधन नव्हते. शहरातील सर्वसाधारण 100 व्यक्तींना यासाठी बोलविण्यात आले होते. त्यांनी परिषदेत केलेल्या सूचनांची दखल घेण्यात आली आहे त्याचा ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. पक्षाच्या अजेंड्यात या सूचनांचा समावेश केला जाईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
(Edited by Sachin Waghmare)