Kasba Peth By-Election News : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कसब्यामध्ये बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविली जाणार आहे. कसब्यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांना रोखण्याचे आव्हानही भाजपपुढे आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे. दिवंगत आमदार टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे.
यापूर्वी भाजपने पंढरपूर, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक लढवली असल्याचा दाखला ही दिला जात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. तर शिवसेनेनेही कसब्यावर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीतही कुरबुरी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक बिनविरोध करावी, असा मतप्रवाह असला तरी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे.
खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे हे प्रबळ दावेदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वरदा बापट वगळता तिघे उमेदवारीसाठी इच्छुक होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, "‘‘पूर्वी आम्ही महाविकास आघाडीत नव्हतो, त्यामुळे त्यांचे जागावाटप आता लागू होत नाही. या ठिकाणी शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीत काम केले जाईल.’’
बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले,"आम्ही भाजपच्या उमेदवारासोबत आहोत. टिळक कुटुंबाचे योगदान, त्याग कोणालाही विसरता येणार नाहीत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षांनी विचार करावा.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "भाजप कोणाला उमेदवारी देणार यावर निवडणुकीचे बरेचशे गणित अवलंबून आहे. पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्या आदेशानुसार भूमिका निश्चीत केली जाईल.’’
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, "भाजपने उमेदवार दिल्याने पंढरपूर, अंधेरी, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही कसब्यातून निवडणूक लढविण्यास तयार आहोत पक्षाचे नेते अंतिम निर्णय घेतील,"
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारीबाबत अद्याप पक्षामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.