

Pune News : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत म्हणजेच ३१ जुलै २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम लागू करण्यात आले आहेत. योजनेनुसार नोंदणीसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक असून, नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी डिजिटल पीक सर्वेक्षणद्वारे पिकांची नोंद करणे आवश्यक आहे.
तसेच प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणे गरजेचे आहे. जर शेती भाडेपट्टीवरील असेल तर नोंदणीकृत भाडेकरार आणि सामाईक जमीन असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने कडक इशारा दिला आहे. बनावट ७/१२ दाखवून, दुसऱ्याच्या जमिनीवर अथवा अकृषक जमिनीवर पीक विमा काढल्याचे आढळल्यास संबंधित अर्जदाराला कृषी विभागाच्या सर्व डीबीटी योजनांमधून पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील कांदा, सोयाबीन, तूर, भुईमूग, मका आणि बाजरी या प्रमुख पिकांसाठी हे विमा संरक्षण उपलब्ध आहे. शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रात, पोस्ट कार्यालयात, बँक शाखेत किंवा थेट 'क्रॉप इन्शुरन्स' पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी रक्षक हेल्पलाइन १४४४७ वर संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.