पुणे : क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात पंच असलेला व फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला किरण गोसावी समित पटेल या नावाने देशातील विविध शहरातून पोलिसांना गुंगारा देत फिरत होता.लखनौ, कानपूर, हैदराबाद, सोलापूर, सातारा, विजापूर या शहरातून तो पुण्यात आल्यानंतर बुधवारी त्यास पोलिसांनी पकडले.
गोसावी हा जॉब रॅकेटचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याविरोधात ठाणे जिल्ह्यात दोन आणि अंधेरी व कळवा सागरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे, अशी माहिती गुरुवारी पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली.बुधवारी रात्री अटक केल्यानंतर गोसावी याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी त्याला पाच नोव्हेंबर पोलिस कोठडी सुनावली आहे.
परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तीन लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी चिन्मय श्रीधर देशमुख (वय २२, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी शेरबानो महम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. मुंबर्इ) हिला यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
गोसावीने फिर्यादी यांना मेट्रोपोल हॉटेल मलेशिया या ठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी ३ लाख ९ हजार ३९५ रुपये स्वीकारले आहेत. गोसावीने ही रक्कम कुरेशी हिच्या बँक खात्यावरून स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेरबानो हिने या बँक खात्याचा कधीही वापर केला नसून गोसावी हा बनावट कागदपत्रांच्या आधारे शेरबानो हिचे बनावट अकाउंट तयार करून फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी त्या अकाउंटचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.
गोसावी याला जॉब रॅकेटच्या गुन्ह्यात काही साथीदारांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयाने एप्रिल २०१९ मध्ये फरार घोषित केले आहे. फरार काळात गोसावी कुठे राहात होता? त्याला कोणी आश्रय दिला होता? याबाबत तपास करायचा आहे. तसेच गोसावी सध्या वापरत असलेला मोबार्इल बनावट कागदपत्रांचा वापर करून घेतल्याचा संशय आहे. गोसावीने फिर्यादी यांना फोनवर शिवीगाळ केली आहे, या सर्व मुद्यांचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली.
गोसावीने इतरांचीदेखील फसवणूक केली असेल तर त्याच्या विरोधात त्या-त्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हायल हवे होते. मात्र, अद्याप तसे काही झालेले नाहीत. त्यांच्या खात्यावर कोणताही रक्कम जमा झालेली नाही. फरार काळात आरोपी कुठे होता याची माहिती पोलिसांना आहे. आरोपीला प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी नेवून करायचा कोणताही तपास आता बाकी नाही. त्यामुळे पोलिस कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद गोसावी याचे ॲड. सचिन कुंभार यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.