Indurikar Maharaj latest news
पुणे : कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पुण्यातील दोन जणांनी इंदूरीकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तर दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. पुण्यातील राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी इंदुरीकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे. याबाबत दोघांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे तसे निवेदन आणि तक्रार दिली आहे. (Indurikar Maharaj latest news)
अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी, "आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. " असे विधान केले होते. इंदुरीकर यांच्या या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी वाकचौरे व भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली असून त्यांनी अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करण्याच्या सूचना अकोला पोलीस अधीक्षकांना दिली आहे. इंदुरीकर यांच्या किर्तनाची आसपास चौकशी करावी आणि त्यात ते दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९२ (अ) नुसार त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, असा आदेश आयुक्त देशमुख यांनी दिला आहे. यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.
अपत्य जन्माच्या बाबतीतही त्यांनी दोन वर्षांपूर्वी असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले होते. ''स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.
अंधश्रद्धा निर्मुलन समिती इंदुरीकर महाराजांविरोधात चांगलीच आक्रमक झाली होती. समितीने इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांना इंदुरीकरांना दिलासा देत त्यांच्या विरोधातील खटला रद्द केला. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.