Pune NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या गुरुवारच्या (ता.7) लोणावळ्यातील (ता.मावळ) मेळाव्याला न जाण्यासाठी अजित पवार गटाचे स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी दमबाजी केली. या शरद पवारांच्या आरोपांवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू झालेला कलगीतुरा सुरूच असून, तो आणखी वाढला आहे.
कालपर्यंत तो (शेळके) पाया पडायचा, आज लाथा घालतोय, अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना हे शनिवारी (ता.9) पुन्हा आमदार शेळकेंवर बरसले.
शेळकेंनी आपल्याला कसा दम दिला होता, हे बाफनांनी(Madan Bafna) सात तारखेला सांगितले होते, तर आपण एकालाही दम न दिल्याचा खुलासा त्याच दिवशी शेळकेंनी केला होता. दरम्यान, बाफना व त्यांच्या पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रेय पडवळ यांनी वडगाव मावळ येथे पत्रकार परिषद घेऊन त्याचा शनिवारी पुनरुच्चार केला. अनेकांना अशी दमबाजी झाली, पण भीतीमुळे ते पुढे येत नाहीत, असे या दोघांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार(Sharad Pawar) गटाचा अध्यक्ष झाल्यानंतर मला दमदाटी करून वर्क ऑर्डर झालेले एमआयडीसीतील काम आमदार शेळकेंनी थांबवल्याचा दावा पडवळांनी या वेळी केला. त्यामुळे आपले 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. शेळके व त्यांच्या नातेवाइकांकडून ते काम सध्या सुरूआहे, असे ते म्हणाले. आपल्या जिवाला धोका असून किशोर आवारेंचा खून झाला, तसा माझाही होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, यावर शेळकेंकडून उत्तर येण्याची शक्यता आहे.
दमदाटी केली नसूनही ती केल्याचे म्हणणाऱ्या शरद पवारांना भेटून त्याबाबत आपण विचारणा करणार आहे, या शेळकेंच्या विधानावर बोलताना बाफनांनी मोदींशी बोलणाऱ्या शरद पवारांना जाऊन विचारणा करायला शेळके एवढा मोठा झालेला नाही,अशी तोफ डागली. तसेच त्याने तमाशा करू नये, शहाणपणाने वागावे, असा सल्ला त्यांनी दिला.
आमदार मोठा झाला, त्याला वरून ताकद आणि अजित पवारांचा आशीर्वादही मिळाला असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. शरद पवार खोटे बोलले हे मी राज्यभर सांगणार या शेळकेंच्या दुसऱ्या वक्तव्याचाही समाचार घेताना, त्यासाठी तो एवढा मोठा झालेला नाही, असा टोला बाफनांनी लगावला आणि कर दौरा असे आव्हानही त्यांनी दिले.
याचबरोबर 'हा (आमदार शेळके) स्वत: नाही, तर त्याची माणसे दमदाटी करतात असे बाफनांनी सांगितले आणि 'भविष्यात असा प्रकार पुन्हा झाला, तर वेगळा विचार करावा लागेल. अजून आम्ही वाकड्यात शिरलेलो नाही, असा इशाराही त्यांनी दिला. बापाला बाप म्हणण्याची संस्कृती सध्या राहिली नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.