

Pune Development : पुणे शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता नागरी सोयी-सुविधा देण्यास राज्य सरकारचे प्राधान्य आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेतली आहेत. त्यासाठी 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पुणे महानगर नियोजन समितीची पाचवी सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार तानाजी सावंत, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर उपस्थित होते.
पुणे महानगरासाठी विहित कालमर्यादेत ‘स्ट्रक्चर प्लॅन’ तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण यांचा विचार करावा. पुणे महापालिकेत 30 जून 2021 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचे विकास नियोजन महापालिकेने करावे. पुणे ग्रोथ हबसाठी विकास आराखडा शासनाच्या मित्रा संस्थेकडून करण्याबाबत पडताळणी करावी. पुणे शहरामध्ये माण-म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जवळील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची वाट न बघता नागरिकांच्या सेवेसाठी तो सुरू करावा. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावे, असे महत्वपुर्ण आदेशही त्यांनी यावेळी दिले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत टप्प्याटप्प्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, मलनि:स्सारण आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचा मुद्दा आमदार भीमराव तापकीर यांनी सभागृहात मांडला.या गावांचा नियोजित आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र निधीची तातडीची गरज असून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही तापकीर यांनी केली.
समाविष्ट 32 गावांसाठी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी, आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी 400 कोटींचा स्वतंत्र निधी मिळावा, निधीअभावी गती मंदावलेल्या समान पाणीपुरवठा प्रकल्पाला चालना मिळावी, आदी मागण्या तापकीर यांनी केल्या.
शिवाजीनगर मेट्रोचा दुसरा टप्पा आणि शहरातील अंतर्गत रिंगरोड या पायाभूत सुविधांना सरकारने गती द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील खराडी- हडपसर -स्वारगेट- खडकवासला आणि नळ स्टॉप-वारजे- माणिकबाग हे मार्ग तसेच रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, जिल्हा न्यायालय ते लोणी काळभोर अशा विस्तारित कामांना भूसंपादनासह गती मिळावी.
पुण्याभोवतीच्या रिंगरोडसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा आणि निधी वाढवून मिळावा. शहराची अंतर्गत वाहतूक सुरळीत होण्यासाठी भूसंपादन आणि परवानग्या मिळविण्याच्या कामाला वेग यावा, आदी मागण्या आमदार शिरोळे यांनी यावेळी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.