Maval Lok Sabha 2024 Result : चिंचवडच्या सात-बाऱ्यावर जगतापांचं नाव राहणार की जाणार, बारणेंचं 'लीड' ठरवणार !

Ashwini Jagtap, Shankar Jagtap : एक्झिट पोलने बारणेंचा विजय दाखवला असला तरी प्रत्यक्षात जनमताने हा अंदाज खोटा ठरविला, तर जगतापांची मोठी पंचाईत होणार आहे.
Ashwini Jagtap, Shankar Jagtap
Ashwini Jagtap, Shankar JagtapSarkarnama

Maval Lok Sabha Politics : या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसह तेथील आमदारांचीही प्रतिष्ठा पणास लागली आहे. लोकसभेचा निकाल विधानसभेसाठी अनेकांचे भवितव्य ठरणार अन् बिघडणार आहे. मावळात शिंदे शिवसेनेचे श्रीरंग बारणे मैदानात आहेत. मात्र, मावळच्या निकालातून भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप आणि त्यांच्या भावजय व चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या आमदारकीच्या उमेदवारीचाही निकाल लागणार आहे.

मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातून जगताप कुटुंबाचा चिंचवड विधानसभा मतदारसंघावरील सातबारा राहतो, की जातो ठरणार आहे. एक्झिट पोलने बारणेंचा विजय दाखवला असला तरी प्रत्यक्षात जनमताने हा अंदाज खोटा ठरविला, तर जगतापांची मोठी पंचाईत होणार आहे.

देशात 400 पारचा नारा देतानाच मोदी-शाह आणि भाजपने एकेका जागेसाठी जोर लावला होता. त्यातून साम-दाम-दंड-भेद निती वापरून नको त्या तडजोडी आणि फोडाफोडी केल्या. या निवडणुकीत ज्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळणार नाही त्यांचा निकाल लावण्याच्या तयारीत भाजपचे श्रेष्ठी असल्याचे बोलले जात आहे.

बारामती आणि शिरुर या दोन्ही लोकसभेची निवडणूक जशी दोन्ही पवारांची (सिनिअर आणि ज्युनिअर) प्रतिष्ठेची केली आहे. तशीच मावळमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. शिवसेना फुटीनंतर मावळ कुणाचे, तसेच खरी शिवसेना कोणती या प्रश्नांची उत्तरेही या निकालातून समजणार आहेत. त्यात उद्धव ठाकरेंनी अजित पवाराच्या राष्ट्रवादीतून संजोग वाघेरे-पाटील यांना आयात करून त्यांना मावळमध्ये तिकिट दिले. तर, विद्यमान खासदार बारणेंवर शिंदेंनी पुन्हा विश्वास दाखवला. त्यामुळे आपापणे उमेदवार निवडून आणण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंनी मावळात मोठी ताकत लावली.

Ashwini Jagtap, Shankar Jagtap
MVA Vs Mahayuti : एक्झिट पोल खोटा! राज्यात आम्हीच 'किंग'; महायुती अन् आघाडीला भलताच कॉन्फिडन्स..

शहराध्यक्ष म्हणून बारणेंना लीड मिळवून देणे, हे महायुतीतील थोरला भाऊ म्हणून शंकर जगतापांचे नैतिक कर्तव्यच आहे. त्यात शहरातील तीनपैकी पिंपरी आणि चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ हे मावळ लोकसभेत येतात. चिंचवड हा, तर जगतापांचा बालेकिल्लाच आहे. तेथे आतापर्यंतचे चारही आमदार जगताप कुटुंबातील राहिलेत.

मतदारसंघ पुर्नरचनेनंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून ते अपक्ष म्हणून पहिल्यांदा विजयी झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 ला ही तेच आमदार झाले. 3 जानेवारी 2023 ला त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी या निवडून आल्या. तर, त्यानंतर त्यांचे दीर शंकर जगताप हे भाजपचे शहराध्यक्ष झाले.

पक्षाचे आमदार आणि शहराध्यक्ष असे दोघेही एकाच जगताप कुटुंबातील आहेत. त्यामुळे महायुतीतील शिवसेनेच्या बारणेंना निवडून आणण्याची डबल जबाबदारी जगताप कुटुंबावर तथा भावजय आणि दिरावर आहे. त्यामुळे आपल्या बालेकिल्यातून जर त्यांनी या निवडणुकीत लीड दिले, तर त्यांना विधानसभेसाठी क्लेम करता येणार आहे.

शंकर जगताप हे, तर पोटनिवडणुकीलाही इच्छुक होते. या पोटनिवडणुकीत चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चांगलीच ताकद दिसली. त्यांचे उमेदवार नाना काटे यांनी लाखभर मते घेतली होती. मात्र, सहानुभूतीच्या लाटेवर अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या. आता चिंचवडमध्ये बारणेंना लीड मिळाले नाही तर जगतापांच्या चिंचवडवरील वर्चस्वाला सुरुंग लागेल, अशी चर्चा आहे. त्यातून त्यांचा या मतदारसंघावरील सातबारा पुसला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com