

तळेगाव दाभाडे : राज्यात महायुती असली तरी मावळ तालुक्यात मात्र भाजप–राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढतीपेक्षा थेट संघर्षाचे वातावरण आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागल्याने वडगावसह तळेगाव, लोणावळा आणि देहू या ठिकाणी राजकारण तापले आहे.
वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद महिला आरक्षणाचे आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महिलांमध्ये अभूतपूर्व चुरस निर्माण झाली आहे. या प्रतिष्ठेच्या पदासाठी तब्बल दहा महिला इच्छुक असून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वडगाव ही मावळ तालुक्याची राजधानी असून ऐतिहासिक व राजकीय दृष्ट्या महत्वाचे शहर मानले जाते.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रथमच महिला नगराध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे “वडगावच्या नगराध्यक्षपदी कोण?” याची चर्चा शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झालेल्या वडगावमध्ये पहिला नगराध्यक्ष म्हणून मयूर ढोरे यांनी अपक्ष म्हणून बहुमान मिळवला होता.
नगरपंचायतीत २०,१४० मतदार असून एकूण १७ प्रभागांपैकी ९ जागा महिला आरक्षणाच्या आहेत. प्रत्येक वार्डात तीन ते चार उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी बंडखोरीचे सूरही उमटण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबोली ढोरे, सुनिता कुडे व वैशाली पंढरीनाथ ढोरे या तिघींची उमेदवारीची चर्चा आहे.
भाजपकडून सुप्रिया चव्हाण, सीमा भोसले, सुनंदा म्हाळसकर, सोनाली म्हाळसकर, सारिका भिलारे, राणी म्हाळसकर या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मनसेकडून सायली म्हाळसकर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
मावळ तालुक्यातील राजकारणात सध्या महायुतीची शक्यता धूसर दिसत असली तरी वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होण्याचे संकेत आहेत.
शिवसेनेचीही भूमिका महायुती टिकवण्याची असून, स्थानिक पातळीवर मतभेद मिटवून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अंतिम क्षणी शिंदे गट–भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी त्रिपक्षीय महायुती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगराध्यक्षपदी महिला आरक्षण आल्यानंतर वडगावची सत्ता कोणाच्या हातात जाते — ‘घड्याळाचा गजर होतो की कमळ फुलते’, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
प्रभाग १ – अनुसूचित जमाती महिला
प्रभाग २ – ओबीसी सर्वसाधारण
प्रभाग ३ – सर्वसाधारण
प्रभाग ४ – ओबीसी महिला
प्रभाग ५ – सर्वसाधारण महिला
प्रभाग ६ – ओबीसी सर्वसाधारण
प्रभाग ७ – अनुसूचित जाती सर्वसाधारण
प्रभाग ८ – ओबीसी महिला
प्रभाग ९ – सर्वसाधारण महिला
प्रभाग १० – सर्वसाधारण महिला
प्रभाग ११ – सर्वसाधारण
प्रभाग १२ – सर्वसाधारण
प्रभाग १३ – सर्वसाधारण
प्रभाग १४ – अनुसूचित जाती महिला
प्रभाग १५ – सर्वसाधारण
प्रभाग १६ – सर्वसाधारण महिला
प्रभाग १७ – सर्वसाधारण महिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.