Pune News: एका सरकारी कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचारी काम करतात, त्यामुळे राज्याच्या सहा लाख कोटी रुपयांच्या बजेटमधील दोन लाख चाळीस हजार कोटी रुपये निव्वळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्ची पडतात, असे वक्तव्य अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. आता त्यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
याच दृष्टीने विचार केला, तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला रोहित पवार यांनी नाव न घेता अजितदादांना लगावला. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले, असे उपहासात्मक ट्विट त्यांनी आज केले.
त्यातून शरद पवार आणि अजित पवार या चुलते-पुतण्यातील संघर्ष आता पुढील पिढीत पोचल्याचे दिसून येते. दुसरीकडे अजितदादांविषयी त्यांची चुलत बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका मात्र अजूनही हळवी आणि सॉफ्ट अशीच आहे. पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करून कोल्हापूरला उत्तर सभेसाठी निघालेल्या अजितदादांना परवा डेमोक्रेटिक पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
त्याद्वारे त्यांनी सरकारी नोकरभरती ही खासगी कंपनीऐवजी शासनामार्फतच करण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना सरकारी कर्मचार्यांच्या वेतनावर मोठा खर्च होत असल्याचे सांगत एका सरकारी कर्मचार्याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचाऱ्यांचे पगार होतात व ते काम करतात, असे अजितदादा म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर दीडशे कोटी रुपये खर्च, 'शासन आपल्या दारी'च्या एकेका सभेसाठी आठ ते दहा कोटी रुपये खर्च, या कार्यक्रमाच्या जाहिरातीवर ५२ कोटी खर्च तसेच गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार सरकारने कधी केला नाही व करतही नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
ही शेकडो कोटी रुपयांची वारेमाप उधळपट्टी सरकारला चालते, मग नोकरभरतीसाठीच ते एवढा बारीक विचार का करते, असा खडा सवालही त्यांनी केला. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहे.
केंद्र सरकारप्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. त्यांना कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल, तर राज्य सरकारच एखाद्या कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, असा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Edited by - Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.