उत्तम कुटे
पिंपरीः अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट सोबत घेत थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सत्तेतील समीकरण पुन्हा एकदा बदलले. गेले वर्षभर विरोधी बाकावर असलेला राष्ट्रवादी पक्षातील अजित पवारांचा गट आता सत्ताधारी बाकावर बसला आहे. त्यामुळे एकमेकांचे राजकीय 'जानी दुश्मन' म्हणून ओळखले जाणारे आता 'जानी दोस्ता'च्या रोलमध्ये निभावत आहेत.
त्याचाच भाग म्हणजे मावळातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मामा-भाचे आजी,माजी आमदार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके(Sunil Shelke) आणि भाजपचे बाळा भेगडे खूप दिवसांनी मंगळवारी (ता.१८) तळेगावात एका व्यासपीठावर आले. त्यामुळे त्याची संपूर्ण मावळ तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
एका अराजकीय कार्यक्रमात म्हणजे जैन इंग्लिश स्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सोहळ्यात ही राजकीय युती दिसली. या शैक्षणिक कार्यक्रमात राजकीय नेत्यांचीच मांदियाळी होती. २०१९ पर्यंत भाजपमध्येच असलेल्या शेळकेंना अजित पवार(Ajit Pawar)यांनी त्यावर्षी राष्ट्रवादीत घेतले. त्यावर्षीच विधानसभेला मावळात शेळकेंनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दणदणीत पराभव केला. त्यांची आमदारकीची हॅटट्रिक चुकवली. तेव्हापासून या दोघांत राजकीय वैमनस्य सुरु झाले. नंतर ते पराकोटीस पोहचले.
यावर्षी गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत ते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. मात्र, त्यांचे दोन्ही पक्ष सत्तेत राज्यात एकत्र आले.त्यातून हे दोघे मामा,भाचे आजी,माजी आमदारही एकाच व्यासपीठावर खूप दिवसांनी एकत्र आल्याने मावळ तालुक्यात त्याची जोरदार चर्चा झाली. ती अजून सुरुच आहे.
राष्ट्रवादीत भूकंप होऊन दोन जुलैला नवे राजकीय समीकरण राज्यात उदयास आले.सत्तेसाठी विभिन्न विचारधारा एकत्र आल्याने त्यावरून टीकाही झाली. हाच धागा पकडून विधानसभेत मावळचा किल्ला जोरदार लढविणाऱ्या आमदार शेळकेंनी जैन शाळेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातही जोरदार बॅटिंग केली.राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबईत सुरु झाले आहे. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पहिल्या दिवशी अधिवेशनात कोण विरोधक आणि कोण सत्ताधारी हेच कळत नव्हतं, असे ते म्हणताच उपस्थितांनी त्याला जोरदार दाद दिली.
कोण कुणाच्या मांडीला मांडी लावून बसेल,हे सांगता येत नाही,असे ते म्हणताच पुन्हा हास्यस्फोट झाला. जे वर सुरु झालंय ते तळेगावातही घडतंय असं भाष्य त्यांनी स्वत व बाळा भेगडें(Bala Bhegade)च्या एकत्र येण्यावर करताच पुन्हा हशा पिकला.तसेच विरोधकांना (आजी,माजी आमदार शेळके व भेगडे) एकत्र आणणाऱ्या आय़ोजकांना तुम्ही हुशार आहात अशी पावती दिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मावळ तालुक्याला पुढे नेण्यासाठी एकत्र आले पाहिजे,असा मेसेज य़ा कार्यक्रमातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोणकोणत्या पक्षाचा,विचाराचा यापेक्षा आपला नागरिक महत्वाचा आहे असे आमदार शेळके अखेर म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.