पिंपरी : शाळेत जा-ये करण्यासाठी दररोज काही किलोमीटर पायपीट करावी लागणाऱ्या मावळ (जि.पुणे) तालुक्याच्या जावण या दुर्गम भागातील मुलांची पायपीट बुधवारी (ता.१८) एका दिवसासाठी तरी थांबली. कारण त्यांना खुद्द मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनीच `लिफ्ट` दिली.
मावळ तालुक्याचा निम्मा भाग हा अतिशय दुर्गम आहे. त्यातही आंदर मावळ हे तर सह्याद्रीच्या डोंगर रांगातच आहे. तेथील मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी दररोज काही किलोमीटरची पायपीटच करावी लागते. त्यातही हा रस्ताही सपाट, सरळ नाही. चढ-उताराची ती वेडीवाकडी डोंगरवाट असल्याने चालणेही मुष्किल ठरते. अशी शाळेसाठी पायपीट करावी लागणाऱ्या मुलांसाठी आता इलेक्ट्रीक सायकली देण्याचा मानस असल्याचे आ. शेळके यांनी आज `सरकारनामा`ला सांगितले.
कारण चढ उताराच्या या मुलांच्या मार्गात साध्या सायकलींचे कामच नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे इलेक्ट्रीक तथा गिअरच्या सायकली प्रायोजकांमार्फत देण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. तसेच या मुलांच्या शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत एसटीचे टाईमटेबल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी आ. शेळके मावळ तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावर होते.
चावसर, शिळींब, वाघेश्वर गावातील विकासकामांची पाहणी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी उरकून ते अजीवलीहून सायंकाळी पवनानगरला निघाले होते. त्यांच्या मोटारीमागे `एस्कॉर्ट` ची ही मोटार होती. त्यावेळी त्यांना दहा-बारा शाळकरी मुले-मुली शाळा सुटल्यानंतर घरी पायी जाताना दिसली. संवेदनशील व चौकस अण्णांनी लगेच गाडी थांबवली.
या मुलांना दोन्ही गाड्यांत घेतले. हे पाहून मुले हरखून गेली. सकाळी शाळेत येताना पायी चालण्याचा झालेला त्रास ती विसरली. कारण खुद्द आमदारांनीच त्यांना लिफ्ट दिली होती. नंतर त्यांना शाळेपासून चार-पाच किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या जवन या गावात घरापर्यंत सोडण्यात आले.
दरम्यान, मोटारीत बसल्यावर तुम्ही सायकलने ये-जा का करीत नाही, अशी विचारणा आ. शेळकेंनी केली असता रस्त्याच्या चढ-उतारामुळे सायकल चालविणे अवघड असल्याचे मुलांनी सांगितले. तर, काही मुलांची आर्थिक परिस्थिती गिअर तथा इलेक्ट्रीक सायकल घेण्याएवढी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना आता सायकली देण्याचा आमदार सुनील शेळके यांचा विचार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.