पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी मनसे (mns)अध्यक्ष राज ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पक्षात पुन्हा एकदा प्राण फुकण्याचा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढविण्याच्या हेतुने मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे (vasant more) आक्रमक झाले आहेत.
राज यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करीत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांना शेअर करत 'जब हम दो साथ खडे तो सबसे बडे' अशा शब्दात रूपाली यांना आव्हानच दिले आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपणार नाही, असा 'मॅसेज' ही रुपाली यांना द्यायला मोरे विसरले नाहीत. मी आणि साईनाथ बाबर राज यांच्यासोबत कायम राहणार असल्याचेही मोरे यांनी पुणेकरांना दाखवून दिले आहे.
महापालिकेतील आपले सहकारी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह राज यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न मोरे यांनी केला आहे. त्यापलिकडे जाऊन महापालिका निवडणुकीत पक्षाची पडझड होणार नाही, यादृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी आखल्याचेही मोरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून देत आहेत. विशेष म्हणजे रुपाली यांना पक्षातील अन्य नेत्यांकडून डावलले जात असताना, मोरे मात्र; रुपाली यांच्या पाठिशी कायम राहिले होते. आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायांवरून रुपाली-मोरे एकत्र येऊन लढत राहिले होते. परंतु, रुपाली यांची साथ सुटल्याने मोरेही आता सावध पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच ते संघटना मजबूत करण्यावरच भर देण्याच्या प्रयत्नात आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रुपाली यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा देत जवळपास राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचाही पर्याय आपल्यापुढे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे पुढच्या चोवीस तासात रुपाली यांच्याकडे नव्या पक्षाची धुरा असणार हे स्पष्ट आहे. रुपाली यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरताच मनसेच्या गोठात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आणि निवडणुकांच्या आधी म्हणजे पुढच्या काही दिवसांत मनसेचे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडतील, असे अंदाज बांधले जात आहेत.
शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मोरे यांनी संघटनेच्या विस्तारासाठी स्वतःला झोकून दिले आहे. महापालिकेतील संख्याबळ वाढविण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यातच रुपाली यांच्यासारखे साथीदार पक्ष सोडून जात असल्याने मोरे हे आता पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकविण्याच्या प्रयत्नात आहेत. राज यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत मोरे आणि बाबर हे राज यांच्यासोबत भक्कमपणे असल्याचे दाखवून देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.