Medha Kulkarni : ऐकावे ते नवलच! आता मुरलीअण्णा अन् मेधाताईंचे ‘हम साथ चले तो जितेंगे...'

Murlidhar Mohol & Medha Kulkarni : कोथरूड भागात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमासाठी अनेकदा मेधा कुलकर्णी यांना निमंत्रण दिले जात नव्हते. कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार असतानाही मेधाताईंना वारंवार डावलले जात असायचे.
Muralidhar Mohol - Medha Kulkarni
Muralidhar Mohol - Medha Kulkarni Sarkarnama

Pune Bjp Political News : पुण्याच्या राजकारणात विशेषत मुरलीधर मोहोळ, महापौर तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्यात राजकारणावरून, श्रेयवादावरून नेहमीच छत्तीसचा आकडा राहिल्याचे पुणेकरांना ठावूक आहे. बालभारती रस्ता, कोथरूड येथील थोरात उद्यानातील मेट्रो प्रकल्प याबरोबरच कोथरूड येथील विविध विकासकांमावरून या दोघांमध्ये नेहमीच खटके उडत राहिले. पण आता मेधाताई दिल्लीच्या राजकारणात म्हणजे राज्यसभेत आल्या आणि त्यानंतरच्या काही दिवसात मुरलीधर मोहोळ हे दिल्लीतच पण लोकसभेत आले.

आता कोथरूडमधील पण राजकीय वैर असलेले मुरलीधर मोहोळ आणि मेधाताई दिल्लीच्या राजकारणात राहिल्याने त्यांच्यातील राजकीय वैर वाढणार का याकडे साऱ्याचे लक्ष होते. मात्र मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू होताच मुरलीधर मोहोळ, मेधाताई कुलकर्णी पहिल्यांदा दोघे एकत्र दिल्लीत भेटले. मेधाताई आणि मुरलीअण्णांचे फोटो सेशन झाले. तेव्हा 'हम साथ चले तो जितेंगे' असे सांगत मेधाताईंनी पुण्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार केला. खरोखरीच पुण्याच्या राजकारणात हे दोघे एकत्र असतील का, आणि त्यांच्याच कुठच्याही विषयावरून पुन्हा वाद तर होणार नाही ना, याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आत्तातरी मेधाताईंनी केलेल्या दाव्यामुळे ऐकावे ते नवलच ! असे वाटत आहे.

कोथरुडमध्ये (Kothrud) मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील वाद सर्व परिचित आहे. कुलकर्णी या कोथरूड विधानसभेच्या आमदार असताना चांदणी चौकात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सतत त्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत होत्या. त्यानंतरच्या काळात त्यांचे आमदारकीचे तिकीट देखील भाजपने कापले. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या जागेवर तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. चांदणी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमात देखील कुलकर्णी यांना डावलण्यात आले होते. त्यावेळी मुरलीधर मोहोळ महापौर म्हणून कार्यरत होते.

Muralidhar Mohol - Medha Kulkarni
Pune Bjp : धंगेकर पडले, धीरज घाटे, हेमंत रासने आमदारकीच्या उमेदवारीसाठी लढले !

कोथरूड भागात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमासाठी देखील अनेकदा मेधाताईंना निमंत्रण दिले जात नव्हते. कोथरूडच्या भाजपच्या (Bjp) माजी आमदार असतानाही त्यांना वारंवार डावलले जात असायचे. महापौर मुरलीधर मोहोळ कोथरूडचे असल्याने त्यांच्याच माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले जात होते. यामध्ये देखील माजी आमदार असलेल्या मेधाताईंना बोलविले जात नव्हते. याबाबात त्यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती.

राज्यसभेच्या खासदार म्हणून मेधा कुलकर्णी यांचे नाव जाहीर झाल्यानंतरही मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यातील मतभेद कमी झाले नव्हते. राज्यसभेसाठी संधी मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना मेधा कुलकर्णी यांनी जुन्या गोष्टी उकरून काढणार नाही, असे सांगत मोहोळ आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर बोलणं टाळलं होतं. भाजपने मोहोळ यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मेधा कुलकर्णी एक पाऊल मागे येत त्यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या. मोहोळ यांचे औक्षण करून लोकसभेसाठी मोहोळ यांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com