पुणे : संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला.
पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘ राज्यात महापूर आला. अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळायची आहे. त्यांना पीक विमा मिळायचा आहे. विशेष जास्त पाऊस नसतानाही पूर का आला, याची अद्याप चौकशी झालेली नाही.
कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप मिटला तरी त्यांच्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत.२९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे शेकड्यांनी वाढले आहेत. अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करणे चालू आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत.तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी.पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता, असे पाटील यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.