Pimpri: शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency 2024) युतीच्या उमेदवारीचा पेच अखेर मिटला. शिरूरमध्ये अजित पवारांना अखेर आपला उमेदवार सापडला असून, त्याची घोषणा आजच होण्य़ाची शक्य़ता आहे. तेथे २०१९ चीच पुनरावृत्ती होणार आहे. या लढतीतून अजितदादांना (Ajit Pawar)एका दगडात दोन नाही, तर तीन पक्षी मारायचे आहेत.
शरद पवार,अजित पवार म्हणजे युती आणि आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर लोकसभेत युतीचे उमेदवार म्हणून शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao adhalrao Patil) यांचे नाव काल नक्की झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादीकडून ते लढण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे कोल्हेंविरुद्ध सक्षम उमेदवार नसल्याने तो ते आयात करणार आहेत. त्यासाठी आढळरावांना घरवापसी करावी लागेल. कारण शिवसेनेत येऊन २००४ ला पहिल्यांदा खासदार होण्यापूर्वी ते राष्ट्रवादीत होते. त्यांच्या नावाची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत जाण्याची परवानगी घेण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांची काल मुंबईत भेट घेतल्याचे कळते. त्यावेळीच त्यांना तयारीला लागण्यास सांगण्यात आले.
लांडेवाडी, मंचर (ता.आंबेगाव) येथील आपल्या निवासस्थानी दर रविवारी होणारा जनता दरबार रद्द करून आढळराव यांनी तातडीने परवा मुंबई गाठली होती. त्यानंतर काल (सोमवार) "सरकारनामा"शी बोलताना माझ्यादृष्टीने पक्ष महत्त्वाचा नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचेही ते उमेदवार असू शकतात,असेच जणूकाही सूचित केले. तर, परवाच अजित पवार यांनीही शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या आमदारांची बैठक तेथील उमेदवार ठरविण्यासाठी मुंबईत बोलावली होती. तीत खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध कायम असल्याचे दिसून आले. तो कसा अजितदादा दूर करतात, हे आता पाहावे लागणार आहे.
शिरूरमधून आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी शरद पवार यांनी अगोदरच जाहीर केली आहे, तर आता आढळरावांचेही नक्की झाल्याने पुन्हा या दोघांतच लढाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गतवेळी २०१९ ला कोल्हेंनी आढळरावांचा खासदारकीचा चौकार चुकवला. त्याचे उट्टे काढण्याची संधी त्यांना यानिमित्ताने चालून आली आहे. तशीच ती अजितदादांनाही साधायची आहे. कारण त्यांनी कोल्हेंचा पराभव करण्याचे चॅलेंज दिलेले आहे. तो करून त्यांना आपली प्रतिष्ठा राखायची आहे. त्यातून त्यांनी गत विधानसभेला २०१९ मध्ये पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्या सांगून केलेल्या पराभवाची पुनरावृत्ती आता लोकसभेला कोल्हेंचा तो करून करायची आहे. शरद पवार यांना शह द्यायचाही त्यांचा विचार आहे.अशाप्रकारे एका दगडात दोन नाही, तर तीन पक्षी त्यांना मारायचे आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.