पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल; शहराध्यक्षपदाची धुरा चिंचवडकडून भोसरीकडे

महापालितेत भाजप की राष्ट्रवादीची सत्ता येणार हे माजी आमदार विलास लांडे यांचे नातेवाईक असलेले आमदार महशे लांडगे व अजित गव्हाणे ठरवणार आहेत.
Vilas Lande, Mahesh Landge and Ajit Gavhane
Vilas Lande, Mahesh Landge and Ajit Gavhane Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे शहरात प्रशासक नियुक्त होण्याची चिन्हे आहेत. परिणामी निवडणूक तयारीसाठी वेळ मिळणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शहर नेतृत्वात फेरबदल केला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या जागी अजित गव्हाणे यांची, तर महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांच्याऐवजी कविता आल्हाट यांची नियुक्ती करून शहराची सूत्रे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुणाईकडे दिली आहेत. युवक अध्यक्ष म्हणून विशाल वाकडकर यांच्या जागी इम्रान शेख यांची नेमणूक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळी पुण्यात जाहीर केली.

राष्ट्रवादीचे तिन्ही नवे पदाधिकारी हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या नव्या बदलात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची छाप दिसून येत आहे. गव्हाणे हे त्यांचे भाचे आहेत तर, त्यांचे भाचे-जावई असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत भाजप की राष्ट्रवादी कोणाची सत्ता आणायची हे भोसरी म्हणजे लांडगे व गव्हाणे हे लांडे यांचे दोन तरुण नातेवाईक पदाधिकारीच ठरवणार आहेत.

आता शहराध्यक्षांच्या मदतीला एक नाही तर तीन कार्याध्यक्ष दिले जाणार आहेत. सध्या प्रशांत शितोळे हे एकच कार्याध्यक्ष आहेत. ते भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यांना कायम ठेवून आणखी दोन नवे कार्याध्यक्ष पिंपरी आणि भोसरीतून देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राहुल भोसले (भोसरी) आणि जगदीश शेट्टी (पिंपरी) यांच्या नावावर कार्याध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. ही यंग ब्रिगेड महापालिकेत पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या खांदेपालटामुळे गेले काही दिवस सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेला विराम अखेर मिळाला आहे.

हिजाबच्या वादात आता अमेरिकेची उडी! भारताला ठणकावून सांगितलं की..

मुंबई, पुण्यातील बैठका घेऊन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शहरातील पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आदी ज्येष्ठांचे मतही विचारात घेण्यात आले. त्यानुसार अध्यक्षपदाची दोन टर्म झालेले शहराच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाघेरे यांच्यागी भोसरी विधानसभा मतदारसंघातील तरुण नगरसेवक गव्हाणे यांची नियुक्ती केली गेली. याव्दारे राष्ट्रवादीची धुरा चिंचवडकडून भोसरीत गेली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत आणण्याची मोठी जबाबदारी भोसरीवर आली आहे.

Vilas Lande, Mahesh Landge and Ajit Gavhane
वाईन विक्रीवरून ठाकरे सरकार अडचणीत? वाद पोचला उच्च न्यायालयात

भोसरीचा वरचष्मा सत्तेत, भाजपमध्ये आणि आता राष्ट्रवादीतही

पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी, चिंचवड आणि पिंपरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी भोसरीची शहरावर सध्या सत्ता आहे. कारण भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे म्हणजे शहराचे कारभारी हे भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे आहेत. महापालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष भोसरीचे अॅड. नितीन लांडगे आहेत. त्यामुळे शेकडो कोटी रुपयांचे नवे रस्ते,विकासकामे भोसरीत सुरु आहेत तसेच, मंजूर होत आहेत. त्यामुळे भोसरीतून भाजपला सुरुंग लावण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. त्यातूनच नात्यागोत्याचे राजकारण असलेल्या भोसरीसह शहराला नवा शहराध्यक्ष हा भोसरीतून देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com