'पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल'

पुणे शहर राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Devendra Fadnavis & Prashant Jagtap
Devendra Fadnavis & Prashant JagtapSarkarnama

पुणे : भाजप (BJP) नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली होती. त्यांच्या या टीकेवर पुणे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis & Prashant Jagtap
नसीम खान यांची 'ती' मागणी गृहमंत्र्यांनी केली मान्य..

जगताप म्हणाले, फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण प्रभावाने सक्रिय आहेत. त्यांनी या काळात राजकीय आणि सामजिक अवकाश व्यापून टाकला आहे. मात्र, २० वर्षांच्या, त्यातही निम्मा काळ नागपूर शहरातील एका मतदारसंघापुरते सक्रिय असणाऱ्या फडणवीस यांनी पवार यांच्यावर टीका करणे अगदीच हास्यास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पदावर बसावे लागले आहे. त्याचीच मळमळ त्यांच्या मनातून अशा पद्धतीने बाहेर पडत आहे, हे जाणवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत ही टीका केली आहे.

पवार हे गेली ६० वर्षे राजकारण आणि समाजकारणामध्ये आहेत. त्यांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद, केंद्र सरकारमध्ये संरक्षण आणि कृषी या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. याशिवाय, विविध देशांमध्ये गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. फडणवीस यांनी आवर्जून लक्षात ठेवावे अशी गोष्ट म्हणजे, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या त्यांच्यावर देण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन कसे असावे, असा राष्ट्रीय पातळीवरचा धडा पवार साहेबांनीच आखून दिला आहे. एकूण राजकीय जीवनामध्ये असतानाच, पवार यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळींशी असणारी नाळही कायम ठेवली आहे.

राज्य आणि देशाच्या राजकीय, सामाजिक जीवनामध्ये त्यांनी पक्षातीत भूमिका बजावली आहे. त्यामुळेच, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी आणि त्यांच्या सल्ल्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतील नेते कायम त्यांच्याकडे येत असतात. राजकारणाच्या पलिकडे जाऊन, पक्षीय नेत्यांशी कौटुंबिक सख्य जोपासण्याचा दिलदारपणाही पवार साहेबांकडे आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदीही वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या मतांचा आवर्जून विचार करतात. त्यामुळे, सरकार चालवताना पवार साहेबांचा सल्ला आणि निवडणूक प्रचारात त्यांच्यावर टीका असेच धोरण भाजपने ठेवले आहे. फडवणीसांनी मात्र त्यांच्या नेतृत्वाकडून फक्त टीका करण्याचा आदर्श घेतला आहे, असेही जगतापांनी सुनावले.

Devendra Fadnavis & Prashant Jagtap
बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी शरद पवार येणार होते; पण...

पवारांनी सहा दशकांच्या कारकीर्दीमध्ये १४ निवडणुका लढवल्या आणि सर्वच्या सर्व वाढत्या मताधिक्याने जिंकल्या. वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर देशाच्या १३ राज्यांमध्ये आमदार निवडून आणणे, तीन राज्यांमध्ये खासदार निवडून आणणे, केंद्रातील सत्तेमध्ये सहभागी होणे, ही किमया पवार करू शकतात. या सोबतच बीसीसीआय आणि आयसीसी या क्रिकेट संघटनांची धुराही त्यांनी सांभाळली. राज्यातील अनेक संस्था-संघटनांना आधार दिला. अनेक संघटना उभारून, त्या जागतिक दर्जाच्या केल्या. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून वेगवेगळ्या देशांच्या प्रमुख नेत्यांबरोबर संबंध निर्माण केले. याउलट, फडणवीसांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्यासाठीही कोणत्या तरी लाटेचा आधार घ्यावा लागतो. पवार साहेबांसारख्या पात्रतेचा विचार करायलाही फडणवीसांना दुसरा जन्म घ्यावा लागेल, अशी खरमरीत टीकाही जगतापांनी केली आहे.

केवळ निवडणुकीचा विचार करून लोकप्रिय घोषणा करायच्या आणि कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन निवडणूक जिंकायची, हा पवारांचा स्वभाव नाही. राजकारण करत असताना, केवळ निवडणुकांपुरता विचार करायचा नसतो. तर, या राजकारणातून सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करायचा असतो, माणसांना जोडायचे असते. त्यांची आयुष्ये उभी करायची असतात. त्यांनी राज्यामध्ये अवेक नेते उभे केले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. आजही, फडणवीस यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले, तर त्यांच्या आशीर्वादावर मोठे झालेले नेतेच त्यांना दिसतील. फडणवीसांनी एकदा पक्षाची झूल अंगावरून फेकून उभे राहावे, मग त्यांना त्यांची ताकद काय आहे, हे कळून येईल. केवळ स्पर्धेपूर्वी औषधे खाऊन दंडाच्या बेटकुळ्या फुगवण्यासारखी फडवणीसांची अवस्था आहे. तर, पवार साहेबांच्या तालमीमध्ये फडणवीसांपेक्षा जास्त ताकदीचे कितीतरी नेते तयार झालेत. पण, कोणत्या तरी लाटेवर स्वार होऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते झालेल्या फडणवीस यांना वास्तवाचे भान आलेले नाही, हेच पुन्हा एकदा दिसून येते.

Devendra Fadnavis & Prashant Jagtap
ST कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत आंदोलकांना भाजप शिधा पुरवणार

जगताप म्हणाले, गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीवेळी पवारांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्या निवडणुकीमध्ये भाजपचा उन्मादाचा फुगा फुटला होता. आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली आहे. फडणवीस यांच्या प्रतिक्रियेतील उल्लेख पाहता, उत्तर प्रदेशातील आणि गोवा भाजपच्या पराभवाचे संकेत मिळत आहेत. या पराभवाच्या भीतीने सैरभैर झालेल्या फडणवीस यांना पवार यांच्यावर टीका करावीशी वाटत आहे. मात्र, फडणवीसांनी त्यापेक्षा त्यांचा आदर्श घेऊन काही पावले टाकली, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही जास्त फायदा होईल, असा खोचक सल्लाही दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com