Mumbai News : मावळ तालुक्यातील कामगारांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो, याचा अर्थ सरकारने जो काही निर्णय घेईल, त्याचं आम्ही समर्थन करू, असं आम्हाला गृहीत धरू नका. पुढील आठवड्यात मी कामगारांसह रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा आमदार शेळके यांनी सभागृहातच देऊन टाकला. (NCP MLA Sunil Shelke's warning to the government)
आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी औचित्याच्या मुद्यावर मावळ (Maval) तालुक्यातील ‘जनरल मोटर्स’ कंपनीतील कामगारांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, माझ्या मावळ मतदारसंघातील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगार गेल्या अडीच वर्षांपासून नव्याने जी कंपनी येईल, त्यात रुजू करून घेण्यात यावं, यासाठी सातत्याने मागणी करत आहेत. राज्य सरकार, न्यायालयातही लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने काही निर्णय दिले, त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी जनरल मोटर्स कंपनीच्या बाजून निर्णय दिले, असे त्या कामगारांनी माझ्यापर्यंत पोचविण्याचे काम केले आहे.
सुनील शेळके म्हणाले की, जवळपास १६०० हून अधिक कामगार कंपनी रोलवर काम करतात. राज्यभरातून आलेले अडीच हजारापेक्षा अधिकचे कर्मचारी ठेकेदारी किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करतात. कंपनीकडून आज सांगितलं जात आहे की, आपल्याला ११० दिवसांचे व्हीआरएस पॅकेज देणार आहोत. ता. २७ जुलैपर्यंत आपण कंपनीत यावं, ॲग्रीमेंटवर सही करावी आणि आपण कंपनीतून बाहेर पडावं. तुम्ही जर २५ जुलैपर्यंत आला नाही तर आम्ही तुम्हाला पुढचं पॅकेज देणार नाही, अशी तंबीही कंपनीकडून कामगारांना देण्यात आलेली आहे.
सभागृहात सध्या कामगार आणि उद्योगमंत्री दोघेही आहेत. माझी दोघांनाही विनंती आहे की, आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो, याचा अर्थ सरकारने जो काही निर्णय घेईल, त्याचं आम्ही समर्थन करू, असं आम्हाला गृहीत धरू नका. पुढील आठवड्यात हे सर्व कर्मचारी आपल्या परिवाराला घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. मीसुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणार आहे. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.