शरद पवारांच्या मेळाव्याआधीच राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भाजप (Bjp) सत्ताधारी असलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri chinchwad) महापालिकेतील भ्रष्टाचार सोमय्यांना दिसत नाही का, अशी विचारणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिकाSarkarnama

पिंपरी चिंचवड : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) मागच्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. मात्र भाजप सत्ताधारी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार सोमय्यांना दिसत नाही का, अशी विचारणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीने आरोप केला की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि चार कर्मचारी १८ ऑगस्टला एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना सापडले होते. यामुळे स्थायीतील टक्केवारी, लाचखोरी प्रथमच चव्हाट्यावर आली. तसेच पालिकेच्या निविदा प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा केवळ आरोपच नाही, तर तक्रारीही केल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या २५० कोटी रुपयांच्या एका कामाला तर तांत्रिक मंजुरी सुद्धा घेतली नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी (दि. १४) समोर आली होती. त्यामुळेच हा सर्व भ्रष्टाचार, गैरव्यवहार किरीट सोमय्यांना दिसत नाही का अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghore Patil) यांनी केली आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सत्तेच्या काळातील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे केल्या आहेत. त्याची लवकरच चौकशी लागेल आणि त्यात कारवाई देखील निश्चीत होईल. तसेच २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित रामराज्य पिंपरी-चिंचवडमध्ये येईल, असा आशावादही वाघेरेंनी व्यक्त केला.

तर सत्तेपासून दूर ठेवल्याची सल मनात असल्यामुळे सोमय्या बेछुट आणि तथ्यहीन आरोप करी सुटले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सुडबुध्दीने आरोप करण्यासाठी पुढे केले आहे, अशी टीका भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली. यापूर्वी नारायण राणे, बबनराव पाचपूते, विजयकुमार गावीत, कृपाशंकरसिंह यांच्यावर सुद्धा सोमय्यांनी आरोप केले होते. मात्र हे सगळे भाजपमध्ये येताच ते शांत झाले. त्यामुळे हे नेते आता पवित्र झाले का? त्या आरोपांचे पुढे काय झाले, अशी विचारणाही लांडे यांनी केली.

भाजपच्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी सत्तेच्या काळात पिंपरी पालिकेला नरक बनविले आहे. त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही लांडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाघेरे आणि लांडे यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला. यावेळी शहरातील पक्षाचे नेते आझम पानसरे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com