Kasba By Election NCP News : कसबा पेठ (Kasba By Election) आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) काल (मंगळवारी) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेनं घेतलेल्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी समाजमाध्यमावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. "आम्ही भाजपला पाठिंबा देणार पण प्रचारात सहभागी होणार नाही," असं मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं आहे. भाजप नेत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना पाठिंबा देत असल्याचं वागसकर यांनी जाहीर केलं आहे.
"बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत," अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी मनसेवर टीका केली आहे. "गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडमधून राष्ट्रवादी आणि कॉग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत," असे जगताप यांनी म्हटलं आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना विनंती केली होती, पण कसबा पेठमध्ये काँग्रेसचा तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा, अशी विनंती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. यानंतर मनसेने भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी याआधी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीवेळीही ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर भाजपने अंधेरीच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेतला होता.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती, या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. ऋतुजा लटके यांचा या पोटनिवडणुकीत विजय झाला.
कसबा पेठेत भाजपकडून हेमंत रासने यांना तर चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना आणि राष्ट्रवादीने चिंचवडमधून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.