Vidya Chavan : वाढती महागाई, बेरोजगारी आणि भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांचा होत असलेल्या अपमानाविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रदेश महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यातून सुरु केलेली जनजागर यात्रा गुरुवारी (ता.५) उद्योगनगरीत आली. यावेळी झालेल्या पहिल्या कोपरा सभेत पक्षाच्या महिला नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.
भाजपचा भगवा हा भोगाचा प्रतिक झाल्याची तोफ महिला राष्ट्र्वादीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी डागली. महागाई व बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून धर्माचे राजकारण सुरु असल्याची टीका त्यांनी केली. त्यासाठी लव्ह जिहाद, हिजाब, हिंदुत्व असे मुद्दे ते पुढे आणत आहेत. त्यांचा हा ढोंगी धर्मांधपणा सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.
औरंगजेबाला औरंगजेबजी म्हणणारी भाजप (त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतं बावनकुळे) अजितदादांना त्यावरून प्रश्न विचारत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी ही चर्चा करण्याऐवजी महागाई आणि बेरोजगारीवर बोलावे,असे आव्हान त्यांनी दिले.
सभेपूर्वी घेतलेल्या पत्रकारपरिषदेतही चव्हाण यांनी महागाई आणि बेरोजगारीवर ठोस भूमिका घेत नसल्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महागाई कमी करा, असा सवाल आता लोकांनीच सरकारला केला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
शिंदे टोळीचे सरकार अशी संभावना त्यांनी राज्य सरकारची केली. आम्ही लोकप्रतिनिधी सभागृहात जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी इतरच प्रश्नांवर चर्चा करतो,असा घरचा आहेर त्यांनी यावेळी दिला.सावित्रींच्या लेकींचा महागाई आणि बेरोजगारीविरोधातील हा जागर आहे, असे त्या म्हणाल्या.
अगोदर ठरल्यानुसार उद्योगनगरीतील पिंपरी,चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघातून हा जनजागर होणार होता. मात्र,भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे परवा निधन झाल्याने त्यांचा मतदारसंघ टाळून बाकीच्या दोन मतदारसंघात ही यात्रा गेली.
तेथेच चार कोपरा सभा झाल्या.त्यातील पहिल्या पिंपरी कॅम्पातील सभेत चव्हाण बोलत होत्या. यावेळी प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्षा कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यातील भिडेवाडा येथे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.उद्या मावळात नंतर नवी मुंबई,ठाणे,मुंबई करीत चैत्यभूमी,दादर येथे या यात्रेच्या पहिल्या टप्याची सांगता होणार आहे. तर, दुसरा टप्पा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी) नागपूरच्या चैत्यभूमी येथून सुरु होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.