varsha2.jpg
varsha2.jpg

अन्य बोर्डाच्या शाळांना द्यावा लागणार ‘मराठी’च्या तासाचा अहवाल

राज्य सरकारने मराठी विषय इतर बोर्डाच्या शाळांना यापूर्वीच सक्तीचा केला आहे.

पुणे : राज्यातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांसह आयसीएसई, आयबी, केंब्रिज या शिक्षण मंडळांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविणे राज्य सरकारने यापूर्वीच बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे संबंधित शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जाते की नाही, याची सखोल माहिती आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शाळांकडून मागविली आहे.(Other board schools will have to give an hourly report of 'Marathi') 

सरकारच्या निर्णयानुसार या शाळांना ‘मराठी’च्या तासाचा अहवाल राज्य परिषदेला द्यावा लागणार आहे. यातून अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये प्रत्यक्षात मराठीचे धडे दिले जातात की नाही, याचा उलगडा लवकरच होऊ शकणार आहे.

शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी ‘मराठी भाषा सक्तीचा अधिनियम-२०२०’ काढण्यात आला आहे. त्याद्वारे राज्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या आणि मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज या बोर्ड अंतर्गत शाळांना ‘https://www.research.net/r/MARATHIBHASHA’ या लिंकवर क्लिक करून सर्व प्रश्नांची माहिती भरण्याची सूचना राज्य परिषदेने दिली आहे. ही माहिती भरण्यासाठी शाळांना ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून सूचनेप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश राज्य परिषदेचे सहसंचालक डॉ. विलास पाटील यांनी दिले आहेत.

याद्वारे आता संबंधित शाळांमध्ये मराठी भाषा कधीपासून शिकविण्यात येते, किती विद्यार्थ्यांना आणि कसे मराठीचे शिक्षण दिले जाते, त्यासाठी कोणत्या पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला जातो, तसेच किती पाठ्यपुस्तके विकत घेतली आहेत. मराठी भाषा शिकविणारे शिक्षक किती आणि त्यांना प्रशिक्षण दिले आहे का, किती विद्यार्थी मराठी शिकत असून मराठीचा वापर करत आहेत, त्याशिवाय मराठी भाषा शिकविण्यासाठी किती शिक्षकांची भरती केली आहे, अशा स्वरूपाची सविस्तर माहिती संबंधित शाळांकडून मागविण्यात आली आहे. शाळांकडून ही माहिती मिळाल्यानंतर त्यातून राज्य सरकारच्या मराठी भाषा सक्तीच्या अधिनियमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे, याचे चित्र समोर येईल. त्यानुसार शासनाला पुढील पावले उचलणे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Ghongade
    
    
    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com