शिवाजीराव आढळरावांनी तरुणांना फसविले...अक्षयदेखील तसेच करीत आहे : पाचुंदकर

शिवाजीराव आढळरावांनी तरुणांना फसविले...अक्षयदेखील तसेच करीत आहे : पाचुंदकर

टाकळी हाजी : ``अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रांजणगाव एमआयडीसी परिसरात फसवे रोजगार मेळावे सुरू केले आहेत. त्यांच्या वडिल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही बेरोजगार तरुणांची फसवणूक केली. आता अक्षय देखील तसेच करत आहे,`` अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केली आहे. 

अक्षय यांनी नुकताच या परिसरात रोजगार मेळावा घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते शिवसेनेकडून उमेदवार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही त्यांच्यावर आतापासूनच बाण रोखला आहे.

याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात पाचुंदकर यांनी म्हटले आहे की बेरोजगार तरूणाईचे मतदान विरोधात गेल्याने आढळराव यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे खडबडून जागे झाल्याने आता शिरूर विधानसभा मतदारसंघातील 39 गावांसाठी रोजगार मेळावा घेतला. मात्र या मेळाव्याला एकही कंपनी उपस्थित राहिली नव्हती, असा आरोप पाचुंदकर यांनी केला.

आढळराव यांनी लोकसभेच्या आपल्या पहिल्या निवडणुकीत 2004 मध्ये बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देणार, असे भावनिक आवाहन केले होते. त्यासाठी तरूणांकडून कागदपत्रे गोळा केली होती. प्रत्यक्षात तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच नसल्याचा आरोप त्यांनी केला.

तरूणांची मते आगामी विधानसभेत विरोधात जाऊ नये यासाठी आमदाबाद ( ता. शिरूर ) येथे अक्षय यांनी रोजगार मेळावा घेतला. यामध्ये `निम कॅान्ट्रक्ट` व `प्लेसमेंट कॅान्ट्रॅक्ट`वाले बोलावून तरूणांची दिशाभूल करण्यात आली. या मेळाव्यात एकही कंपनी उपस्थित राहिली नाही. केंद्र शासनाने उद्योगपतीच्या फायद्यासाठी `निम` सारखा कायदा  आणला आहे. या कायद्यामुळे तीन वर्षे काम केलेल्या कामगाराला काढून टाकतात. हा कायदा अन्यायकारक असल्याने त्याच्याविरोधात लढणे अपेक्षित आहे. मात्र अशा मेळाव्याचे आयोजन करून बेरोजगार तरूणांची दिशाभूल केली जात असल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.
 
या मेळाव्यात किती कंपन्या हजर होत्या. किती बेरोजगार तरूणांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या, हे जाहीर करावे. असे आव्हान पाचुंदकर यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com