मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे, पार्थ पवारांचा सूचक इशारा

पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मावळातील (Maval) शेतकऱ्यांना नुकसानीबद्दल शासनाद्वारे आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
Parth Pawar & Shrirang Barne
Parth Pawar & Shrirang BarneSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, (Pimpri- Chinchwad) मावळच (Maval) नाही, तर राज्यातील विविध प्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) हे ट्विट करीत सबंधित यंत्रणांचे लक्ष त्याकडे वेधत असतात. रविवारच्या (ता.७ नोव्हेंबर) नगर जळीतकांडानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे ट्विट काल (ता.९ नोव्हेंबर) केले. त्यानंतर कालच त्यांनी दुसऱ्या ट्विटव्दारे मावळातील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे, असा सूचक इशारा दिला. त्यातून ते गेल्या २०१९ च्या लोकसभेला मावळ मतदारसंघातून पराजित झाले असले, तरी तेथील समस्यांविषयी ते जागरूक असल्याचे व त्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्यांनी वरील इशारा कोणाला दिला, याची चर्चा मावळच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही आता सुरु झाली आहे.

Parth Pawar & Shrirang Barne
मी डुकरांशी कुस्ती खेळत नाही! फडणवीसांचे वादग्रस्त ट्विट

पिंपरी-चिंचवडसह मावळात पार्थ वगळता ट्विटरवर सक्रिय असलेला राष्ट्रवादीचा एकही लोकप्रतिनिधी, नेता, पदाधिकारी नाही. तसेच, विजय मिळाला नाही, म्हणून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह मावळ लोकसभा मतदारसंघाकडेही दूर्लक्ष केलेले नाही. तेथील राजकीय घडामो़डीच नाही, तर प्रश्नांवरही ते लक्ष ठेवून असल्याचे त्यांची ट्विट साक्ष देत आहेत.

मावळात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके वगळता इतर कोणी सोशल मि़डियात व त्याव्दारे तरुणाईच्या संपर्कात असल्याचे दिसत नाही. पिंपरी-चिंचवडमधील पक्ष पदाधिकाऱ्यांना, तर, सोशल मिडियाचे वावडेच असल्याचे दिसून आले आहे. त्याविरुद्ध भाजपचे शहरातील दोन्ही आमदार फेसबुक, ट्विटरवर सक्रिय राहून तरुणाईच्या संपर्कात आहेत.

Parth Pawar & Shrirang Barne
पवार कुटुंबाच्या राजकारणाची सुरवात केशवराव जेधेंच्या त्या निर्णयामुळे झाली..

राज्यातील भंडारा जिल्हा रुग्णालय व देशातील इतर रुग्णालयातील कोरोना काळातील आगीनंतर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांचेही फायर ऑडिट झाले नसल्याची बाब समोर आली. त्यावर ती गंभीर असल्याचे ट्विट त्यांनी दिवाळच्या दुसऱ्या (ता.२ नोव्हेंबर) दिवशीच केले. देशात कोरोना कालावधीत रुग्णालयात आग लागून अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयांचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिटही झाले असल्याची संबंधितांनी तत्काळ खात्री करून घ्यावी, अशी महत्वाची मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.

त्यानंतर पाच दिवसांनीच नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयूला आग लागून ११ निष्पाप कोरोना रुग्णांचा बळी गेला. त्यातून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांबाबत केलेली सूचना किती महत्वाची होती, याचाच प्रत्यय आला. तिची अंमलबजावणी आता, तरी प्रशासनाने तातडीने करून नगर दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, हे पाहणे नितांत गरजेचे बनले आहे. त्याची जाणीव पार्थ यांनी काल (ता.९ नोव्हेंबर) प्रशासनाला पुन्हा ट्विटच्या माध्यमातून करून दिली. पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, निष्पाप रुग्णांचा होरपळून बळी जाण्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका स्तरावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांना सुचविले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या जोडीने मावळातील समस्यांवरही पार्थ यांचे लक्ष असतं, याची साक्ष त्यांची ट्विटच आहेत. ८ तारखेला त्यांनी मावळ परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली होती. चिंता व्यक्त करूनच ते थांबले नाहीत. तर, दोन दिवसांच्या पावसाने कापणीला आलेला भात भिजल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला शासनाद्वारे आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी मावळातील रस्ते समस्येवर काल (ता.९) ट्विट केले. मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी आणताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. परिणामी पवन-अंदर मावळातील रस्त्यांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे, असे सांगत त्यांनी तेथील रहिवाशांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न काल केला. तसेच, मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे, असा इशाराही त्यांनी त्यातून मावळातील आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नेते यांच्याजोड़ीने तेथील सत्ताधाऱ्यांनाही दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com