पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे तीस नगरसेवक नाराज ; नेतेच ठेकेदार!

''पाणी, रस्ता,वीज म्हणजे विकास नाही,'' असे म्हणत त्याआधारे प्रसिद्धीचे ढोल बडवणाऱ्या शहर कारभाऱ्यांना कामठे यांनी आणखी डिवचले.
Tushar Kamthe
Tushar Kamthesarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Municipal Corporation)सत्ताधारी भाजपचे (bjp)तीस नगरसेवक नाराज असल्याचा गौप्यस्फोट गुरुवारी (ता.२४) पक्षाचा राजीनामा दिलेले नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamthe) यांनी आज (ता.२५) जाहीरपणे केला.

पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असल्याचे सनसनाटी वक्तव्यही त्यांनी केले. राजीनामा का दिला, हे सांगण्यासाठी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी भाजपच्या शहरातील भाजपच्या दोन्ही आमदारांनी आपल्या निधीतून वा राज्याच्या बजेटमधून शहरात काय कामे केलीत ते दाखवून द्यावे,असे खुले आव्हान त्यांना दिले. महापालिकेच्या पैशातून ही कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड भाजप ही भाजप नाहीच मूळी, त्यांच्यात भाजपचा एकही गुण नाही,असा घरचा आहेर नगरसेवकपदाचाच राजीनामा दिलेले व अद्याप भाजपमध्ये असलेल्या कामठे यांनी दिला. त्यातून पिंपरीतील भाजप ही राष्ट्रवादीची बी टीम आहे, हे ओपन सिक्रेट पु्न्हा अधोरेखित झाले. त्यांचे कारभारीच नाही, तर बहूतांश नगरसेवक सुद्धा यापूर्वी राष्ट्रवादीत होते.

गेल्या निवडणूकीत त्यांनी सामूहिक पक्षांतर करीत घड्याळ सोडून कमळ हातात घेतलेले आहे. भाजपचे ३० नगरसेवक पक्षावर नाही,तर स्थानिक नेत्यांवर नाराज आहेत, असे कामठे म्हणाले. त्यांचा रोख हा भाजपचे शहराचे कारभारी आमदार चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांच्या दिशेने होता. हे स्थानिक नेते हे नेते नसून ठेकेदार आहेत. आवश्यक कामापेक्षा ते भ्रष्टाचाराच्या कामांना महत्व देत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांची मोघलाई, हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराला कंटाळूनच नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.

आपण लावून धरलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पक्ष धावून आला असता,स्थानिक नेत्यांनी मदत केली असती,तर राजीनाम्याची वेळच आली नसती,असे ते म्हणाले. हा भ्रष्टाचार पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घातला होता. सभागृहात तो उपस्थित करून त्यावर कारवाई होण्यासाठी महिनाभर वाटही पाहिली. पण, ती न झाल्याने अजित पवारांकडे त्याबाबत तक्रार केली अन तिची लागलीच दखल घेत कार्यवाही होऊन गुन्हा दाखल झाला, असे ते म्हणाले. फक्त नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असून भाजप पक्ष सदस्यत्व सोडलेले नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

Tushar Kamthe
मराठा आरक्षणासाठी मुंबई डबेवाले सरसावले ; संभाजीराजेंचे उद्यापासून उपोषण

कुठल्या पक्षात जायचे याचा निर्णय झाला नसून तो आठ दिवसांत घेणार आहे, असे ते म्हणाले. भाजपचे २५-३० नगरसेवक संपर्कात असून त्यांचा टप्याटप्याने पक्षात प्रवेश होईल, हे कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले होते. त्यांच्या या दाव्याला कामठे यांच्या ३० नगरसेवक नाराज असल्याच्या आजच्या वक्तव्याने दुजोरा मिळाला.

''पाणी, रस्ता,वीज म्हणजे विकास नाही, असे म्हणत त्याआधारे प्रसिद्धीचे ढोल बडवणाऱ्या शहर कारभाऱ्यांना कामठे यांनी आणखी डिवचले. ''बाकीच्या नाराज २९ भाजप नगरसेवकांची काही ना काही अडचण असल्याने ते गप्प आहेत, समोर येत नाहीत. मला, मात्र कुठले पद नको आहे. माझी कसली अडचण नाही. म्हणून मी समोर येऊन बोलतो आहे,'' असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com