Ashadhi Wari News: आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र आळंदीत जमले असताना या वारीला पहिल्याच दिवशी गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला. आज (दि.11 जून) संध्याकाळी चार वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान झालं. मात्र, पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असताना पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये काहीसी झटापट झाली.
पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान होत असताना मंदिरात प्रवेश करण्यासाठी वारकरी आग्रही होते. मात्र, यावेळी पोलीसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झालेल्या या झटापटीबद्दल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकाराबद्दल भाष्य करत पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं आहे. "आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे काय म्हणाले?
"पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत तीन वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले".
"मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र, आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते".
"बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करत आहेत. महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये", असं पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी म्हटलं.
पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये नेमकं काय झालं?
आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढपूरच्या दिशेने प्रस्थान झालं. यावेळी 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो.
मात्र, यातील काही वारकऱ्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारला. त्या वारकऱ्यांनी प्रवेश देण्याचा आग्रह केल्याने पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर सौम्य लाठीचार्जचे वृत्त पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी फेटाळलं आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.