
Dalit Girls Case Kothrud: पुरोगामी समजल्या जणाऱ्या पुण्यात तीन दलित मुलींचा कोथरुड पोलिस ठाण्यात छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अट्रोसिटी कायद्याचे महत्त्व, पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढताय. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही. पोलिसांना एवढी भीती कशाची? असा सवाल आंबेजकरांनी पुणे पोलिसांनी विचारला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावरुन पुणे पोलिसांवर संताप व्यक्त केला आहे. "पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? आदोलनकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढणे, हे पुणे पोलिसांचे अपयश आहे!जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस आयुक्तालय सोडणार नाहीत," असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.
काल (रविवारी) रात्री सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, आणि पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते.
औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली.
या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे.
यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. पुणे पोलिस त्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली, असे आंबडेकर यांनी म्हटलं आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकरांनी दिली.