
पुणे : पुणे कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश बापट यांना साडेबारा हजार मतांची आघाडी मिळाली आहे. लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात बापट यांना मिळालेली ही सर्वात कमी मतांची आघाडी आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी मिळविलेली साडेचौदा हजार मते विधानसभेच्या दृष्टीने कॉंग्रेसबरोबर भाजपालाही काळजी करायला लावणारी आहेत.
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा हा मतदारसंघ आहे. काॅंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कांबळे यांनी काॅंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना मात दिली होती. पुणे शहरातील इतर पाच विधानसभा मतदारसंघांतून बापट यांनी जोरदार लिड घेतले. मात्र त्यांना कॅन्टोन्मेंटमध्ये केवळ साडेबारा हजाराच्या अधिक्यावर समाधान मानावे लागले.
निवडणूक जशी कांबळे यांना सोपी नाही तशी ती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनोदखील सोपी नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना मिळालेली मते पाहता या दोघांनाही काळजी करावी लागेल हे निश्चित. या मतदारसंघात बापट यांना 67 हजार 177 तर कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी 54 हजार 444 मते मिळाली आहते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना 14 हजार 699 मते मिळाली आहेत.
या मतदासंघातून बागवे यापूर्वी आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, गेल्या विधानसभेला भाजपाचे दिलीप कांबळे पुन्हा एकदा निवडून आले. 1995 साली झालेल्या निवडणुकीत कांबळे पहिल्यांदा या मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागली. गेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कांबळे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. या मतदारसंघातून खासदार बापट यांना झालेले मतदान पाहता कांबळे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. त्याचबरोबर कॉंगेसचे शहरध्यक्ष बागवे यांनादेखील मार्ग सोपा नाही.
हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. सर्व जाती-धर्माचे मतदार मोठ्या संख्येने या मतदारसंघात राहतात. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाधव यांना या मतदारसंघाने आश्वासक अशी मते मिळाली आहेत. जाधव यांना मिळालेली बहुतांश मते ही कॉंग्रेसची पारंपरिक मते आहेत. विधानसभा निवडणूक वंचित आघाडी स्वबळावर लढणार असल्याने या मतदारसंघात बागवे आणि कांबळे या दोघानांही विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. वंचित आघाडीचा उमेदवार किती मते मिळवितो यावरच या मतदारसंघातील विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.