

ब्रिजमोहन पाटील
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आज (ता.७) आपला संकल्पनामा जाहीर केला. पुढील पाच वर्षांत महापालिकेच्या स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून शहराचा विकास करण्यापेक्षा केंद्र व राज्य सरकारच्या निधीवर आधारित प्रकल्पांवर भर देण्यात आल्याचे या संकल्पनाम्यातून स्पष्ट होते. पुण्याला ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर’ (जीसीसी)ची राजधानी करणे, शहराच्या चारही दिशांना मेट्रोचा विस्तार, विमानतळाचा विस्तार, महामार्गांचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४ हजार ई-बस, एआय प्रणालीचा वापर, मध्यमवर्गीयांसाठी हक्काची घरे यासह अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात झालेल्या व प्रगतीपथावरील कामांचाही यात आढावा घेण्यात आला आहे.
भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत हा ३४ पानी संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. संकल्पनाम्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची माहिती देण्यात आली असून सात पाने ही गेल्या दहा वर्षांतील कामांसाठी राखीव आहेत. २०१७ नंतर पहिल्या पाच वर्षांत भाजपने जितकी कामे केली, तितकी कामे काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसला ६५ वर्षांत करता आली नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.
भविष्यातील आश्वासनांमध्ये ५०० चौरसफुटांपेक्षा कमी घर असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचा मिळकतकर माफ, महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो व पीएमपी सेवा, ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, ३० वर्षांवरील प्रत्येकाची मोफत आरोग्य तपासणी, वारसा स्थळांभोवतीच्या बांधकामाचा प्रश्न सोडवणे, समाविष्ट गावांना पायाभूत सुविधा मिळेपर्यंत मिळकतकर सवलत, पुण्यात ‘एम्स’ आणण्याचा प्रयत्न, खडकवासला–खराडी मेट्रो विमानतळापर्यंत नेणे, पुणे–मुंबई द्रुतगती मार्गाजवळ डेटा सेंटर, माण–म्हाळुंगे टाउनशिप आणि १५ टीपी स्कीमची कामे गतीने पूर्ण करणे यांचा समावेश आहे.
४० टक्के मिळकतकर सवलतीचा संभ्रम
महापालिकेकडून १९७० पासून पहिल्या घराला मिळणारी ४० टक्के मिळकतकर सवलत २०१९ ते २०२१ या काळात बंद होती. नंतर ती पुन्हा लागू करण्यात आली. मात्र भाजपच्या संकल्पनाम्यात ही सवलत पुढील पाच वर्षेच सुरू राहील, असा उल्लेख असल्याने सवलतीच्या कायमस्वरूपाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या जाहिरनाम्यात झोपडपट्टी सुधारणा, स्मार्ट सिटी याचा उल्लेख नाही.
अतिक्रमण व फ्लेक्समुक्ती
शहरातील सर्व पादचारी मार्ग अतिक्रमणमुक्त करणे, रस्ते व चौकांचे विद्रूपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आश्वासन संकल्पनाम्यात देण्यात आले आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पादचारी दिन
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘पादचारी दिन’ साजरा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला पादचारी दिन यावर्षी बंद करण्यात आला आहे.
“२०४७ च्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर आधारित पुण्याचे संकल्पपत्र तयार केले आहे. जायका, मेट्रो, विमानतळ हे प्रकल्प केंद्र व राज्य सरकारच्या योगदानातूनच पुढे आले आहेत. पुणेकरांनी भाजपला पुन्हा संधी देतील.”
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.