Pune History News: पुण्यातील थिएटरमध्ये घडवले होते स्फोट

Kumar Saptarshi on Pune History West End Empire Theatre Bomb Blast: कोर्टाच्या तारखेच्या आधी एक दिवस एका कैद्याने शिरुभाऊ लिमयेंच्या कोठडीत एक चिठ्ठी टाकली. शिरुभाऊंना दंडाबेडी म्हणजे हात आणि पाय यांच्यात कड्या घातल्या होत्या.
West End Empire Theatre, Pune – site of a pivotal bomb blast during British rule
West End Empire Theatre, Pune – site of a pivotal bomb blast during British ruleSarkarnama
Published on
Updated on

कुमार सप्तर्षी

सन १९४२मध्ये झालेल्या भूमिगत चळवळीत महाराष्ट्रात साने गुरुजी, एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, शिरुभाऊ लिमये वगैरे नेते खूप सक्रिय होते. शिरुभाऊ लिमयेंनी हरिभाऊ लिमये या तरुणाला हाताशी धरून तरुणांचा एक ग्रुप तयार केला. पूनम हॉटेलचे मालक निळूभाऊ लिमये यांचे हरिभाऊ हे धाकटे बंधू. त्यांचा ‘लिमये वाडा‘ लक्ष्मी रोडला प्रसिद्ध होता. या गटाने बॉम्ब तयार केले होते.

त्या काळात पुण्यामध्ये वेस्ट एंड आणि एम्पायर ही कॅम्प विभागातील दोन सिनेमागृहे राखीव होती. त्यात फक्त लष्कराचे अधिकारी वा जवान सिनेमा पाहू शकत. या दोन्ही थिएटरमध्ये खुर्च्यांखाली बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्या बॉम्बस्फोटात ब्रिटिश लष्करातील सात जवान ठार झाले.

बॉम्ब ठेवणाऱ्यां‍पैकी एक जण पकडला गेला. पोलिसांच्या छळापुढे आपले मानसिक बळ टिकणार नाही, असे त्याला वाटत होते. त्याने फरासखाना पोलिस चौकीच्या स्वच्छतागृहात विषप्राशन केले. अनेक दिवस या कटाचा शोध लागत नव्हता. शेवटी शोध लागला. त्या कटातला एक कच्चा गडी माफीच्या आशेने फुटला होता. या प्रकरणात शिरुभाऊ लिमये यांच्यासह सर्वांना अटक झाली. त्यांना फाशी होणार हे जवळपास नक्की होते. म्हणून त्यांना येरवडा कारागृहात फाशी गेटमध्ये ठेवले होते. न्यायाधीश इंग्रज होता. कटातील सर्वांनी आपल्याला फाशीची सजा होणार, अशी मनाची तयारी केली होती.

West End Empire Theatre, Pune – site of a pivotal bomb blast during British rule
Shiv Sena Politics: तो दिवस शिवसेनेसाठी काळाकुट्ट दिवस होता...गाव तिथे शिवसेना अधिक शक्तीशाली करणार

कोर्टाच्या तारखेच्या आधी एक दिवस एका कैद्याने शिरुभाऊ लिमयेंच्या कोठडीत एक चिठ्ठी टाकली. शिरुभाऊंना दंडाबेडी म्हणजे हात आणि पाय यांच्यात कड्या घातल्या होत्या. त्या कड्या लोखंडी गजाने जोडलेल्या असतात. त्या चिठ्ठीत ‘तुम्ही सही सलामत सुटणार’ असा मजकूर होता. हे त्यांना खरे वाटत नव्हते. पण मनाला उभारी आली होती. या प्रकरणात जो माफीचा साक्षीदार होता, तो कोर्टात उलटला.

त्याची आई कोर्टात आली होती. ती आपल्या मुलाला भेटली व त्याला म्हणाली, “तू या स्वातंत्र्यसैनिकांना ओळखतो असे म्हणालास, तर त्या क्षणी मी फरशीवर डोके आपटून प्राण सोडीन.” तो साक्षीदार एक नजर न्यायाधीशांकडे आणि दुसरी नजर आईकडे ठेवून होता. त्याने प्रारंभीच सांगितले, की “मी यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही.”

West End Empire Theatre, Pune – site of a pivotal bomb blast during British rule
Sunil Tatkare: ‘महाराष्ट्र धर्म’ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया! राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू!

सर्वांना ठाऊक होते, की याच लोकांनी बॉम्बस्फोट घडविला. न्यायाधीशालाही सर्व सत्य ठाऊक होते. पण पुरावा नसताना फाशीची सजा दिली असती, तर ब्रिटिशांच्या न्यायसंस्थेच्या नि:पक्षपातीपणाचा दबदबा कमी झाला असता. न्यायसंस्थेची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी आरोपींना निर्दोष सोडले. भूमिगत चळवळीतील एक-एक करून बहुतेक सर्वांना तुरूंगात पाठवण्यात आले. गुप्तचर खात्यात सर्व भारतीय नोकर होते.

कर्मचारी आपल्या नोकरीला बांधलेले असतात. ते देशहित, लोकहित, स्वकीय-परकीय असा कोणताही भेदाभेद करत नाहीत, हे त्या काळात सिद्ध झाले आणि आजच्या काळातही सिद्ध होत आहे. ब्रिटिश सरकारने एक गुप्त परिपत्रक काढले होते.त्यात म्हटले होते, की ज्या कर्मचाऱ्‍यांची मुले अथवा नातेवाईक भूमिगत स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत, असे कळले तर त्यांची नोकरी संपुष्टात येईल.

महात्मा गांधी यांनी तरुणांना सरकारी नोकऱ्‍या सोडायला सांगितले होते. महात्मा गांधींच्या आदेशानुसार वागण्याकडे तरुणांचा कल होता. तेव्हा सावरकरांचा उदय झाला. त्यांचा त्याला विरोध होता. तेव्हापासून धास्तीत असलेले पालक सावरकरांना मानू लागले. आपल्या मुलांना सावरकरभक्तांना भेटायला सांगू लागले.

पुणे शहरात सावरकर भक्तांच्या गोटात हिंदू महासभेचे प्रांताध्यक्ष प्रसिद्ध वकील ‘भाला’कार भोपटकर, नथुराम गोडसे, नारायण आपटे यांचा समावेश होता. हिंदू राष्ट्र होणारच, अशी त्यांची ठाम धारणा होती. ते साधारणतः: १३-१४ वर्षांच्या ब्राह्मणांच्या मुलांना आपल्या सैन्यदलात भरती करीत. पुढे कम्युनिस्ट झालेले रा. प. नेने हेसुद्धा नववीत शिकत असताना हिंदू राष्ट्राच्या सैन्यदलात सहभागी झाले होते. महात्मा गांधी पुण्यात येरवड्याच्या पर्णकुटीत राहायला होते, तेव्हा त्यांच्या रोज प्रार्थना सभा बी. जे. मेडिकलच्या मैदानावर होत असत.

ज्यूंच्या सिनेगॉगचे (लाल देऊळ) जे मैदान आहे, तिथे होणाऱ्‍या महात्मा गांधींच्या सभेला प्रचंड गर्दी होई. ही गोडसे दलातील मुले ती सभा ऐकायला जात. हे आपटे यांना कळल्यावर त्यांनी या मुलांना प्रचंड दम भरला. ‘हिंदू राष्ट्राचे सैनिक असे गांधींच्या सभेला जात असतील, तर या देशद्रोह्यांना कठोर सजा करणे भाग आहे,’ असा सज्जड दम दिला. त्यानंतर त्यांना एक हॉटेल जाळण्यास सांगितले होते. पुढे आपटे काका फाशी गेले, तेव्हा रा. प. नेने प्रगल्भ, प्रौढ झाले होते. ते कम्युनिस्ट झाले होते. त्यांनीच सांगितलेली ही सत्यकथा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com