Pune News: यंदा पुणे लोकसभेसाठी चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुती, महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने आपला उमेदवार उतरवला होता. खरी लढत ही महाविकास आघाडीचा उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचा उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात होती.
मात्र या निवडणुकीमध्ये मराठा आणि मुस्लिम आणि बहुजन मताचे विभाजन महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. चार उमेदवारांपैकी एक उमेदवाराला हे मतांचे विभाजन विजयी करणार आहे तर बाकी तिघांचे तीन तेरा वाजवणार आहे.
यंदा पुण्यामध्ये 50.32 इतके मतदान झाले आहेत. गेल्या वेळीच्या मतदानाच्या तुलनेत यंदा एक ते दीड टक्याने मतदान वाढले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यांना देखील कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. मागील वेळी कसब्यातून गिरीश बापट हे उमेदवार होते.
कसब्यातील वाढलेल्या टक्क्याचा फायदा त्यांना झाला असल्याचा पाहायला मिळत. यंदा कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) मैदानात आहेत. त्यामुळे कसबा धंगेकरांना देखील तारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे कोथरूडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झाले आहे.असे असले तरी गेल्या वेळीच्या तुलनेत मतदारांची संख्या मात्र वाढले आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे हे होम पीच त्यांना तारणार का हेदेखील पाहावे लागेल.
चार मतदार संघाचा विचार केला तर शिवाजीनगर आणि वडगाव शेरी मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये उत्साह जाणवला नाही. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 49% मतदान झाले आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. तो सायंकाळपर्यंत टिकला.
या मतदारसंघांमध्ये तब्बल 51 टक्के मतदान झाले असून गेल्यावेळीच्या तुलनेत हे अधिक आहे. या भागामध्ये सोसायट्यांबरोबरच वस्ती भागातील मतदान हे सर्वाधिक आहे. सोसायट्या भाजपकडे तर वस्तीतले मतदान हे काँग्रेसच्या दिशेने जाते असा आत्तापर्यंतचा समज आहे. त्यामुळे वस्त्या आणि सोसायटी यांचा मिश्रण असलेल्या या मतदारसंघ कोणाला तारणार हे पाहावे लागेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कॅन्टोन्मेंट मतदार संघाचा विचार केल्यास या मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. या भागात देखील सकाळच्या सुमारास मतदान कमी असले तरी दुपारनंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले. त्यामुळे विधानसभा निहाय पाहायला गेलं तर कॅन्टोन्मेंट आणि पर्वती मतदारसंघांमध्ये ज्याचं पारड जड असेल तो यंदाची लोकसभेची बाजी मारेल असं चित्र दिसत आहे.
मतविभाजनाचा विचार केल्यास काँग्रेसच्या पाठीशी राहणाऱ्या मुस्लिम मतांना एमआयएमचा उमेदवार किती कात्री लावणार तसेच भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे वसंत मोरे यांना किती प्रमाणात मुस्लिम मत मिळणार ते पाहावे लागणार आहे.
या दोघांनाही मिळणाऱ्या मुस्लिम मतांचा फटका हा थेट काँग्रेसला बसणार असल्याचं बोललं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वसंत मोरे यांनी बहुजन मतं घेतल्यास ती भाजपाच्या पथ्यावरती पडतील असेच काही सध्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबरच आपण मराठा समाजाचा उमेदवार असल्याचा देखील ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापुढे मुरलीधर मोहोळ हे देखील मराठा उमेदवार असल्याने मताचे विभाजन किती झाले यावरच खासदार कोण होणार आणि इतर उमेदवारांचे तीन तेरा वाजणार हे ठरणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.