Pune News, 08 Mar : इराण आणि अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरामध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या समुद्र मार्गाने जगभरातील राष्ट्रांना इंधनाचा पुरवठा होतो. तो जलमार्ग युद्धामुळे प्रभावित झाला आहे. त्यामुळे सर्वत्र इंधनाचा तुटवडा जाणवत आहे.
पुढील काही दिवस पुरेल इतकाच इंधनाचा साठा भारतात देखील उपलब्ध असल्याचा समोर आला आहे. त्यामुळे युद्ध असं सुरू राहिल्यास आगामी काळात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने सरकारकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत.
आगामी काळात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने औद्योगिक गॅस वापरावर काही प्रमाणात बंधन आणले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयात म्हटले आहे की, भारत सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने गॅस उपलब्धतेमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे दिनांक ०५ मार्च २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत पुणे शहरातील महानगरपालिकेच्या अंतिम संस्कारसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी व APC (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.
तसेच वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहतील. त्याऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात येत आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.