Porsche Car Accident
Porsche Car AccidentSarkarnama

Porsche Car Accident Update : अखेर 'त्या' मुलाने लिहिला 300 शब्दांचा निबंध!

Pune Porsche Case : दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवून दोन तरुण अभियंत्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन मुलाला अवघ्या 15 तासात जामीन मिळाला होता. यामुळे पोलिस प्रशासन तसेच न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
Published on

Porsche Accident News : कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाची गेल्या आठवड्यात बाल सुधारगृहातून सुटका झाली. ही सुटका करताना त्याला रस्ते अपघातावर लिहिण्यास सांगितलेला निबंध या मुलाने लिहिला आहे. हा 300 शब्दांचा निबंध नुकताच बाल हक्क न्याय मंडळाकडे देण्यात आला आहे. या मुलाच्या वकीलांच्या मार्फत हा निबंध सादर करण्यात आला आहे.

दीड महिन्यापूर्वी 19 मे रोजी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली होती. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीच्या पाठीमागील सीटवर बसलेली तरुणी हवेत उडून जमिनीवर पडली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चालविणारा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला देखील रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघातानंतर चिडलेल्या नागरिकांनी पोर्श कार चालविणाऱ्या तरुणाला गाडीच्या बाहेर काढून त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

Porsche Car Accident
Porsche Car Accident Case : सुटका झाली तरी 'त्याला' 300 शब्दांचा निबंध लिहावाच लागणार !

भरधाव वेगाने कार चालविणाऱ्या या तरुणाने मोठ्या प्रमाणात दारू प्यायल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी (Police) या तरुणाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा तो मुलगा असल्याचे समोर आले. तसेच त्याचे वय 17 वर्षे असल्याची माहिती पुढे आली होती.

या मुलाला वाचविण्यासाठी वडगावशेरी भागातील आमदारांपासून समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा दबाव पोलिसांवर टाकला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला होता. हा मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याच्या रक्ताची तपासणी करून त्याला बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. तेथे रस्ते अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिणे तसेच 15 दिवस वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण घेण्याच्या अटीवर या अल्पवयीन मुलाचा जामीन मंजूर करण्यात आला होता.

दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवून दोन तरुण अभियंत्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन मुलाला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने सोशल मीडियावर याचे जोरदार पडसाद उमटले होते. पोलिस प्रशासन तसेच न्याय मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील या निकालावर आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी या मुलावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. दिलेल्या निकालाचा फेरविचार करत बाल हक्क न्याय मंडळाने या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.

Porsche Car Accident
Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघात 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्याला अभय कोणाचे?

बालसुधारगृहात या मुलाची रवानगी केल्यानंतर पोलिसांच्या तपासात या प्रकणातील अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला. या मुलाच्या रक्तात दारु प्यायली असल्याचे सिद्ध होऊ नये, यासाठी ससून रूग्णालयात त्याचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. यामध्ये त्याचे वडील, आई यांना पोलिसांनी अटक केली. ज्या गाडीने हा अपघात झाला ती गाडी संबधित अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हर चालवित होता, असा जबाब पोलिसांना द्यावा, यासाठी या मुलाच्या आजोबांनी ड्रायव्हरचे अपहरण देखील केल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना अटक करून त्यांना तुरुंगात ठेवले आहे.

या अल्पवयीन मुलाला बेकायदा पद्धतीने बाल सुधारगृहात ठेवल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावनी करताना हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र हा जामीन देताना बाल हक्क न्याय मंडळाने घातलेल्या निबंध लिहिण्याच्या आणि 15 दिवस वाहतुकीच्या निययांचे शिक्षण घेण्याची अट कायम ठेवली होती. त्यानुसार आता या मुलाने 300 शब्दांचा निबंध लिहिला आहे. या अल्पवयीन मुलाच्या वकीलांनी हा निबंध बाल न्याय मंडळाकडे सादर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com