
पुणे : विद्यापीठाच्या प्रांगणाबाहेर राजकीय जोडे बाहेर काढून निवडणुका व्हाव्यात, हे विधान दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात नुकतेच केले होते... त्याला दोन दिवस होत नाही, तोच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा निवडणूक रंगू लागली आहे.
या निवडणुकीत सरळ सरळ दोन पॅनेल एकमेकांच्या आमनेसामने आहेत. यामध्ये एकता पॅनेलवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच भारतीय जनता पक्षाची छाप आहे. परंतु तावडे यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवारांनी कोणत्याही पक्षाचा शिक्का मारून घेतलेला नसली, तरी त्यांची ओळख लपून राहिलेले नाही. पॅनेलवर राजकीय शिक्का नको म्हणून नगर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाची मदतही घेण्यात आली आहे. त्यामुळे 'सर्वपक्षीय पॅनेल' असे सांगण्यासही सुरवात झाली आहे.
अधिसभा निवडणुकीतील नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील उमेदवार पाहिले, तर प्रसेनजीत फडणवीस यांसह अनेकजण पूर्वाश्रमीचे अभाविपचे आहेत. निवडणुकीच्या नियोजनाचे सुकाणू देखील डॉ. ए. पी. कुलकर्णी आणि राजेश पांडे या तावडे यांच्या स्नेहीजनांकडे आहे. निवडणुकीत हमखास यश मिळविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. या द्वयीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु, प्रत्येकालाच अधिसभेवर यायचे असल्याने रिंगणातून माघार घेण्यास कुणी तयार झाले नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि दोन पॅनेलची लढत निश्चित झाली.
दुसऱ्या पॅनेलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असलेले उमेदवार आहेत. यात प्रामुख्याने प्रवरानगरचे डॉ. राजेंद्र विखे, नाशिकचे अशोक सावंत आणि पुण्यातील संदीप कदम आहेत. ही निवडणूक राजकीय नाही, असे त्यांचेही म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र यात राजकारण आहेच. ते काही लपलेले नाही. नगर जिल्ह्यातील राजकीय वादाचा विचार केला, तर विखे गटाच्या विरुद्ध दिशेला थोरात आणि गडाख गट दिसून येतो. दोन्ही गट याबद्दल कबुली देत नसले, तरी त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही.
अधिसभेची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची होत असते. यातून विद्यापीठावर वर्चस्व कोणत्या गटाचे, हे ठरते. अधिसभेतून काही सदस्य हे विद्यापीठाचे महत्त्वाचे अधिकार मंडळ असलेल्या व्यवस्थापन परिषदेवर जातात. त्यामुळे अधिसभेच्या निवडणुकीला महत्त्व असते. या अधिकार मंडळावर नियंत्रण मिळविणारा हा विद्यापीठाच्या राजकारणातील 'बाहुबली' ठरतो. या निवडणुकीला राजकीय रंग नको, हा सुविचार जरी बोलून दाखविला जात असला, तरी कोणत्याच पक्षाचा छुपा हेतू लपून राहतात नाही.
सध्याच्या निवडणुकीचा विचार करता, त्यातील बहुसंख्य उमेदवार आणि त्यांची पार्श्वभूमी पाहिली, तर ती अभाविपकडे झुकणारी आहे. 'राजकीय जोडे विद्यापीठ प्रांगणाबाहेर ठेऊन निवडणूक लढावी,' असे म्हणणारे विनोद तावडे देखील अभाविपचेच आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाची अधिसभा निवडणूक ही त्यांच्या प्रतिष्ठेची असेल, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.