पुणे : पुणे शहराचा कारभारी आता लवकरच बदलणार असून पुण्याबाहेरील चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे नेतृत्त्व जाण्याचे जवळपास निश्चित आहे.
पाटील यांनी आता पुणे महापालिकेच्या कारभारातही लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवरून त्यांनी नगरसेवक, पदाधिकारी यांची नुकतीच झाडाझडती घेतली. त्यामुळे या सर्वांना आता कारभारी बदलल्याचे लक्षात आले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट व त्यांचे समर्थक हे साऱ्या कारभारात कशा प्रकारे सहकार्य करणार त्यावर पाटील यांचे यश अवलंबून राहणार आहे. कारण बापट यांचेच समर्थक नगरसेवक मोठ्या संख्येने आज पुणे महापालिकेत आहेत.
पुण्यासाठी पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याबाहेरचे नेतृत्त्व चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने मिळणार आहे. सुरेश कलमाडी यांनी कलमाडी हाऊसवरून तब्बल बारा वर्षे (1995 ते 2007) पुण्याचा कारभार चालवला. त्या आधी माजी खासदार (स्व) विठ्ठलराव गाडगीळ यांनी गाडगीळ वाड्यावरून पुण्याची सूत्रे हलविली. गाडगीळ यांना विरोधक म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती (स्व) जयंतराव टिळक यांचा गट होता. मात्र सत्तासूत्रे गाडगीळ यांच्याकडेच राहिली.
कलमाडी यांनी कधी काॅंग्रेस, पुणे विकास आघाडी आणि पुन्हा काॅंग्रेसमार्फत सूत्रे आपल्या हातात. 2002 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीशी युती करून सत्ता हातात ठेवली. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि कलमाडी यांचे फारसे जमले नाही. पवार यांनी त्यांना 2007 च्या निवडणुकीत धक्का दिला.
त्यानंतर 2007 मध्ये राष्ट्रवादीने सत्ता महापालिकेत आणली. ही सत्ता 2017 पर्यंत होती. पुण्याचा कारभार हा अजित पवार यांच्या हातात गेला. ते कारभारी बनले. त्यांनी अडीच वर्षे सेना-भाजपच्या सहकार्याने पुणे पॅटर्न म्हणून सत्ता राबविली. काॅंग्रेसला व त्यातही कलमाडींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेल्या या `पॅटर्न`वर तेव्हा मोठी टीका झाली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा काॅंग्रेसला सोबत घेऊन पुण्याचा कारभार चालवला. अजित पवारांचे हे कारभारीपण जवळपास दहा वर्षे टिकले. अजितदादांनी बारामती होस्टेलवरून पुण्याचा कारभार चालवला.
2014 मध्ये पुण्यात भाजपचा खासदार, नंतर भाजपचेच शहरात आठही आमदार निवडून आले. एवढी निरंकुश सत्ता कोणत्याच पक्षाला नव्हती. त्यानंतरच्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची बिकट अवस्था करून भाजप पालिकेत मोठ्या बहुमताने सत्तेवर आला. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्याचे कारभारी झाले. पुणे महापालिकेतच नगरसेवक झालेले आणि नंतर आमदार, मंत्री, खासदार होऊन पुण्याचे कारभारी झालेले बापट हे एकमेव नेते ठरले. पुण्याच्या गेल्या तीस वर्षांतील कारभाऱ्यांनी महापालिकेत जाऊन नगरसेवक पदाचा अनुभव घेतलेले कोणी नव्हते. सत्तेचे इतके पाठबळ कोणत्याच नेत्याला नव्हते. बापट यांनी बहुतांश वेळा महापौर बंगल्यातूनच पुण्याचा कारभार पाहिला. पण त्यांचे हे कारभारीपण चंद्रकांत पाटील यांच्यामुळे अडीच वर्षांतच जाण्याची शक्यता निर्माण झाली.
पाटील हे तर पुण्याचे कायमचे आणि मूळचे रहिवासीही नाहीत. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद असल्याने, त्यातून कोथरूडमधून निवडून आल्याने ते आता पुण्याचे कारभारी बनतील, याची शक्यता फार दूर नाही. त्यामुळे पुण्याच्या कारभारात पाटिलकी सुरू होणार असल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.