पुरंदरचे आमदार फक्त बोलघेवडे : जालिंदर कामठे

''पुरंदरचे आमदार फक्त बोलघेवडे आहेत. गुंजवणीच्या पाण्याचं म्हणून गाजर दाखवलं आणि निवडून आले. कुठं आहे पाणी? काय केलं साडेआठ वर्षात? सातारला जाऊन जमीनी घेतल्या आणि बगलबच्च्यांना वाळूचे ठेके दिले. आपण केलेल्या कामाला हे पाट्या लावणारे हे फलकमंत्री आहेत. म्हणूनच मुंबईवरून आलेलं पार्सल परत मुंबईला पाठवा, अशी तिखट टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता केली.
पुरंदरचे आमदार फक्त बोलघेवडे : जालिंदर कामठे

सोमेश्वरनगर : ''पुरंदरचे आमदार फक्त बोलघेवडे आहेत. गुंजवणीच्या पाण्याचं म्हणून गाजर दाखवलं आणि निवडून आले. कुठं आहे पाणी? काय केलं साडेआठ वर्षात? सातारला जाऊन जमीनी घेतल्या आणि बगलबच्च्यांना वाळूचे ठेके दिले. आपण केलेल्या कामाला हे पाट्या लावणारे हे फलकमंत्री आहेत. म्हणूनच मुंबईवरून आलेलं पार्सल परत मुंबईला पाठवा, अशी तिखट टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता केली.

जेऊर (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. विकासकामांबद्दल बोलताना कामठे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॅा. दिगंबर दुर्गाडे यांनी शिवतारे यांनाच आपल्या भाषणात लक्ष्य केले. कामठे म्हणाले, ''बारामतीचा विकास आणि पुरंदर भकास अशी पुस्तिका काढून आणि घोषवाक्या वापरून शिवतारेंनी पहिली निवडणूक लढविली. बारामतीसारखा पुरंदरचा विकास करणार अशा थापा मारत निवडून आले. त्यानंतर पाच वर्ष 'मी विरोधात आहे कसा करणार विकास?' असे म्हणत दिवस काढले. आता तीन-साडेतीन वर्ष झाली. सत्तेत तर आहेत पण मंत्रीही आहेत. काय केले त्यांनी पुरंदरसाठी? पुरंदरची बारामती कधी करणार? ते स्वतःचा विकास करत आहेत.''

कामठे पुढे म्हणाले, '' ते सारखे सातारला असतात आणि जमीनी घेतात. ह्यांचे बगलबच्चे काय करतात ते बघा. सगळीकडे वाळूचे ठेके. हे गुंजवणीचे पाणी आणतो म्हणाले. मंत्री झालो की एका सहीवर पाणी आणणार होते. कुठं आहे पाणी? सत्तेत आहात ना कुठूनही पाणी आणा. विधानसभा निवडणुकीपूर्वी ह्यांनी पाणी आणले तर आम्ही ह्यांना शाबासकी देऊ. पण हे फक्त बोलघेवडे आमदार आहेत. आपण कामे करतो आणि पाट्या लावायला हे येतात. नुसत्या पाट्या लावायच्या. संडासला सुध्दा पाट्या लावतात.''

''एकदा समोरासमोर येऊन उत्तरे द्या म्हणावं. चुकीचा मंत्री पुरंदरला लाभला. लबाड लांडगा ढोंग करतोय... ह्यांना पेकटात मारली पाहिजे. हे पार्सल मुंबईवरून आले होते. आता पुन्हा मुंबईला पाठवून द्या.'' असेही कामठे म्हणाले.

''पुरंदर उपसा योजना, जानाई शिरसाई योजना ह्या पवारसाहेबांमुळे झाल्या. गुंजवणीचे धरणही त्यांच्याच काळात झाले. ह्यांनी फक्त दार लावले आणि मीच केले म्हणू लागले. एकाच्या काळात मंदिर बांधून झाले पण दुसऱ्याच्या काळात फक्त दरवाजा लावला. एखाद्यानं मंदीर बांधायचं आणि दुसऱ्यानं येऊन नुसते दार लावून मंदिर माझं म्हणायचं अशी आमदारांची अवस्था आहे. अशा माणसाची सगळ्यांनी एकत्र येऊन हकालपट्टी केली पाहिजे,'' अशी टीका डॅा. दिगंबर दुर्गाडे यांनी केली. ''मी पुण्यावरून आलो तर गुंजवणीवरून पुरंदरमध्ये पाईपलाईन आलेली. पुरंदरमध्ये पाण्याचा लोंढाच लोंढा चालला होता,'' अशी खिल्लीही उडविली. सोमेश्वर कारखान्याचे संचालक उत्तम धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. शामराव धुमाळ यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com