अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याची धुरा सोपवली दोन वर्गमित्रांवर!

सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची निवड करण्यात आली आहे
Purushottam Jagtap-Anandkumar Holkar
Purushottam Jagtap-Anandkumar HolkarSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा तिसऱ्यांदा पुरुषोत्तम जगताप यांच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यांचे महाविद्यालयीन वर्गमित्र असलेल्या आनंदकुमार होळकर यांच्याकडे उपाध्यपद देण्यात आले आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीस वर्षांच्या सत्ताकाळात तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळविणारे ते एकमेव ठरले आहेत. (Purushottam Jagtap elected as President of Someshwar Sugar Factory)

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने विक्रमी यश मिळविले होते. त्यानंतर पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच होते. त्यानुसार त्यांच्या वतीने सोमवारी (ता. ८ नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी या दोन्ही नावांची घोषणा केली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया सुरू झाली, तेव्हा जगताप व होळकर यांचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीचे एकेक अर्ज दाखल झाले. त्यामुळे सोपस्करानंतर अधिकृत निवडीची घोषणा झाली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी निवडप्रक्रियेत सहकार्य केले. निवडीनंतर संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, आनंदकुमार होळकर यांची मनोगते झाली. याप्रसंगी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, संदीप जगताप, सुनील भोसले, पोपटराव भोसले, बापूराव धापटे, राजेंद्र जगताप, कौस्तुभ चव्हाण आदी उपस्थित होते.

Purushottam Jagtap-Anandkumar Holkar
मुख्यमंत्री ठाकरे ज्यांना विसरले ते निघाले पंतप्रधान मोदींचे मित्र!

(कै.) रामराजे जगताप हे कारखान्याचे संस्थापक संचालक होते, त्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम जगताप हे राष्ट्रवादीकडून १९९२-९७, २००२-०७, २००७-१५, २०१५-२१ व २०२१-२०२६ असे पाच वेळा संचालक झाले आहेत. मागील पाच वर्षांत त्यांच्या अध्यक्षकाळात कारखाना कर्जमुक्त झाला, चांगला भाव देऊन राज्यातील नामांकित कारखान्यांच्या यादीत सोमेश्वरला बसविले, महत्वकांक्षी विस्तारवाढ सुरू केली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पुन्हा पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला. तर, आनंदकुमार होळकर यांचे वडील शांताराम होळकर यांना जिल्हा बँकेचे संचालकपद भूषविण्याची संधी मिळाली होती. आनंदकुमार हेही २००२-२००७ या कार्यकाळात पहिल्यांदा संचालक झाले. आता दुसऱ्यांदा संचालक होऊन उपाध्यक्षपदावरही हक्क प्रस्थापित केला.

Purushottam Jagtap-Anandkumar Holkar
पंढरपूरच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मागितल्या तीन गोष्टी!

जगताप म्हणाले, ‘‘पवार कुटुंबीयांनी व सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला, याबद्दल त्यांचे आभार. आमचे संचालक मंडळ त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे काम करेल. अत्यंत गतिमान काम करून उत्कृष्ट तांत्रिक क्षमता राखत सभासदांना चार पैसे अधिकचे देण्याचा प्रयत्न राहील.’’ होळकर म्हणाले, ‘‘सोमेश्वर कारखान्यासारख्या नामांकित कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषविणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट अजितदादांमुळे प्राप्त झाली. सभासद, कामगार, वाहतूकदार, मजूर यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com