सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राज्य सरकारने एफआरपीचे (FRP) दोन तुकडे केल्यामुळे पुणे (Pune) जिल्ह्याच्या नीरा खोऱ्यातील शेतकरी कृती समितीचे तिन्ही नेते आक्रमक झाले आहेत. यापूर्वी राज्याच्या ऊस आंदोलनाला दिशा देणारे सतीश काकडे (Satish Kakade), पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) व रंजन तावरे (Ranjan Taware) हे त्रिकूट यानिमित्ताने पुन्हा एकदा राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार आहे. यामुळे एफआरपी आंदोलनाचा केंद्रबिंदू बारामतीकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. (Raju Shetti will agitation against sugarcane FRP from Baramati)
ऊस नियंत्रण आदेश १९६६ अन्वये उसाची एफआरपी (रास्त व उचित मूल्य) अदा करताना मागील हंगामाचा साखर उतारा व तोडणी वाहतूक खर्च विचारात घेतला जाई. मात्र, राज्य सरकारने नव्या आदेशात एफआरपी देताना त्या त्या हंगामातील उतारा आणि तोडणी वाहतूक खर्च विचारात घ्यावा असे म्हटले आहे. परंतु उतारा व तोडणी वाहतूक खर्च हंगामाअखेरीस निश्चित होतात. तोपर्यंत साडेनऊ ते दहा टक्के साखर उताऱ्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता द्यावा लागणार आहे आणि हंगाम संपल्यावर उर्वरीत हप्ता मिळणार आहे. शेतकरी संघटना आणि शेतकरी मात्र अस्वस्थ आहेत. चालू हंगामातच या आदेशाची कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र या आदेशाने शेतकरी संघटनांना रान पेटविण्याची संधी मिळणार असे संकेत होते. आता या आंदोलनाचा केंद्रबिंदू ‘बारामती’ राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी २००८-०९ ते २०१४-१५ या कालावधीतील राज्य सरकारला एफआरपीच्या आंदोलनावरून जेरीस आणले होते. पंढरपूर ते बारामती पदयात्रा करून बारामतीत अचानक ठिय्या मारत धरणे आंदोलन केले होते. शेतकरी कृती समितीचे ‘सोमेश्वर’चे सतीश काकडे, 'माळेगाव'चे रंजन तावरे व 'छत्रपती'चे पृथ्वीराज जाचक या त्रिकूटाने आपापल्या कारखान्यांना जेरीस आणत राज्याला दिशा दिली होती. आंदोलनात तुरूंगवासही भोगला होता. मधल्या काळात आंदोलनांची तीव्रता मंदावली. मात्र, आता एफआरपीचे तुकडे पडल्याने नव्याने त्रिकूट एकत्र येणार आहे. राजू शेट्टी यांनाही 'बारामती'तून हाक दिल्याशिवाय 'राज्य' दखल घेणार नाही, याची कल्पना आहे.
शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे म्हणाले की, एकरकमी एफआरपी हा शेतकऱ्यांचा न्याय्य हक्क आहे. राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी तो दिला तर उत्तमच. अन्यथा यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडणार. शेट्टी यांनीही मागच्याप्रमाणे बारामतीतून आंदोलनाची सुरवात करण्याचा शब्द दिला आहे. सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती हे तीनही कारखाने त्यांना साथ देतील. आंदोलन कारखान्यांच्या वा कुठल्या नेत्यांविरोधात नसून ते राज्य सरकारच्या धोरणाविरोधात असणार आहे.
साखरसंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले की, केवळ खासगीच्या भल्यासाठी एफआरपीचे तुकडे केले आहेत. सहकार व ऊस उत्पादक संपवायचं षडयंत्र आहे. यात सर्व पक्षाचे नेते आहेत. एफआरपी भीक नाही. एकरकमीच घेणार, त्यासाठी आंदोलन तीव्र करण्याबाबत आम्ही तिघेही एकत्र येणार आणि तीनही कारखान्यांवर राजू शेट्टी यांना बोलवून आंदोलन करणार आहोत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.