#कारणराजकारण - डॉ. अमोल कोल्हेः 'साहेबांचा उमेदवार' ते खासदार

आढळरावांचं मतदारसंघातलं स्थान बळकट होतं. प्रचारासाठी त्यांनी उमेदवारीची वाटही पाहिली नव्हती. त्या तुलनेत राष्ट्रवादीकडे नाव कमावलेले नेते भरपूर होते; मात्र लढायला उभे राहण्यासाठी नेत्यांची वानवा होती. डॉ. कोल्हे यांना आयात केले, तेव्हाच त्यांची उमेदवारी ठरली. मात्र, या पक्षात रुजलेली एकूण सरंजामी पद्धत, आला नेता की त्याला 'दादा, मामा, काका, जी, रावसाहेब, दादासाहेब' अशी सन्मान संबोधनं जोडण्याची प्रवृत्ती याला डॉ. कोल्हे अपवाद होते. त्यांनी ठरवले म्हणून ते अपवाद नव्हते; तर राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांच्यादृष्टीने ते फक्त 'उमेदवार' होते.
#कारणराजकारण - डॉ. अमोल कोल्हेः 'साहेबांचा उमेदवार' ते खासदार

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे तीनवेळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का देणारे राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय म्हणजे उमेदवार ते खासदार असा पावणे तीन महिन्यातला प्रवास आहे. डॉ. कोल्हे शिवसेनेतून एक मार्चला राष्ट्रवादीत येतात...पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांना उमेदवारी देतात...राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे धाडस होत नसलेल्या मतदारसंघातून उभे राहतात आणि 23 मे रोजी खासदार बनतात...राजकारण नवा नेता कसा घडवते, याचा हा अनुभव आहे. 

आढळरावांचं मतदारसंघातलं स्थान बळकट होतं. प्रचारासाठी त्यांनी उमेदवारीची वाटही पाहिली नव्हती. त्या तुलनेत राष्ट्रवादीकडे नाव कमावलेले नेते भरपूर होते; मात्र लढायला उभे राहण्यासाठी नेत्यांची वानवा होती. डॉ. कोल्हे यांना आयात केले, तेव्हाच त्यांची उमेदवारी ठरली. मात्र, या पक्षात रुजलेली एकूण सरंजामी पद्धत, आला नेता की त्याला 'दादा, मामा, काका, जी, रावसाहेब, दादासाहेब' अशी सन्मान संबोधनं जोडण्याची प्रवृत्ती याला डॉ. कोल्हे अपवाद होते. त्यांनी ठरवले म्हणून ते अपवाद नव्हते; तर राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांच्यादृष्टीने ते फक्त 'उमेदवार' होते. 

#कारणराजकारण फेसबूक लाईव्ह करताना प्रचारादरम्यान डॉ. कोल्हे यांची भेट झाली. त्या आधी काही कार्यकर्त्यांशी गप्पा सुरू होत्या. कोल्हे कुठं आहेत, असं पहिल्या कार्यकर्त्याला विचारलं. 'उमेदवार कुठंय रे...' त्यानं दुसऱयाला आवाज दिला. एक ज्येष्ठ महिला नेत्या होत्या. त्यांनी सांगितलं, 'उमेदवार जरा फ्रेश होताहेत...'.

गंमत वाटल्यानं त्यांना विचारलं, 'कोल्हेंना उमेदवारच म्हणताय फक्त...अजून दादा वगैरे जोडलं नाहीय?.'

'साहेबांनी दिलाय उमेदवार. बोलतो चांगला. प्रचाराचं आमचं काम...तेव्हढं नेटानं करतोय,' असं त्यांनी सांगितलं. 

डॉ. कोल्हे यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हाही राष्ट्रवादीच्या शिरस्त्यानुसार कार्यकर्त्यांची कोंडाळं भोवती नव्हतं. गळ्यात सोन्याचे सरीवर सर घातलेले 'तळागाळातले' नेतेही सोबत नव्हते. कोल्हे यांनी काही मुद्दे मांडले. काही समजून घेतले. ही भेट झाली, तेव्हा प्रचाराला नुकतीच सुरूवात झालेली होती. प्रचार पुढं जात राहिला, तसतसे डॉ. कोल्हे सुस्साट सुटले. राष्ट्रवादीला न मानवणारा स्पष्टवक्तेपणा त्यांनी भाषणात आणला. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टीव्ही मालिकेत छत्रपतींची भूमिका करणाऱया डॉ. कोल्हे यांना वक्तृत्व, भाषाशैली, देहबोली याबद्दल कुणी शिकवण्याची आवश्यकताच नव्हती. त्यांनी कसलेल्या नेत्यामध्ये असलेले सर्व गुण त्यांनी अल्पकाळात आत्मसात केलेच; शिवाय राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये अभाव असलेला प्रांजळपणाही ठेवला. पाहता पाहता आढळरावांचा शिरूरचा अभेद्य गढ डॉ. कोल्हे यांनी सर केला. 

'साहेबांनी...' म्हणजे पवारांनी दिलेला 'उमेदवार' इतकीच ओळख असलेल्या डॉ. कोल्हे यांचा विजय प्रस्थापित राष्ट्रवादी नेत्यांना इशारा आहे. वर्षानुवर्षे संकुचित राजकारणात समाधान मानणाऱया नेत्यांना काल आलेले उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागंही आता 'खासदार डॉ. अमोलदादा' वगैरे विशेषणंही जोडावी लागणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com