Pimpri Chinchwad News : खरी आणि मूळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तिचे घड्याळ चिन्ह कोणाचे यावरून या पक्षाच्या दोन्ही गटात जुंपली आहे. ही लढाई निवडणूक आयोगाबरोबरच न्यायालयातही सुरू आहे. पण, त्याबाबत निकाल येण्यापूर्वीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर शरद पवार गटाने आपले नवे आलिशान कार्यालय थाटले आहे.
शहराच्या मध्यवस्तीत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शरद पवार राष्ट्रवादीचे हे नवे कार्यालय आहे. तेथून जवळच खराळवाडी, पिंपरीत अजित पवार राष्ट्रवादीचे ऑफिस असल्याने राष्ट्रवादीची दोन कार्यालये एकाच भागात होणार आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उद्योगनगरीतील नव्या कार्यालयाचे उदघाटन परवा (ता.२) होत आहे. यावेळी पदाधिकारी नियुक्त्या केल्या जाणार असून मेळावाही होणार आहे. त्यात पाटील हे दुसऱ्या गटाला आपल्या शैलीत काय शालजोडे मारतात, आगामी निवडणुकीचे रणशिंग कसे फुंकतात याकडे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडमधील अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी असा बहुतांश पक्ष अजित पवार गटात गेला. तरी शरद पवार गटाने कार्यकारी समिती स्थापन करून शहरात काम सुरू ठेवले. युवा नेते रोहित पवार यांना जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी तुषार कामठे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर काळेवाडीत पक्षासाठी कार्यालय तयार केले. त्याचे उदघाटनही पाटील यांच्याच हस्ते सुरू होणार होते. पण, ते मोक्याच्या मध्यवर्ती सोयीच्या ठिकाणी नसल्याने त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही. त्यानंतर ही बावीसशे चौरस फुटांची नवी जागा हेरून महापालिका मुख्यालयाजवळ ते सुरू करण्याचे ठरले. ते पक्षाचेच नाही, तर जनतेचेही कार्यालय राहणार असून त्यांच्या अडीअडचणी तेथे सोडविल्या जाणार आहेत, असे तुषार कामठे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.