Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नियमीत एका विषयाची चर्चा होते. ती म्हणजे पहाटेच्या शपथविधीची, या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीमध्ये विस्तृत भाष्य केले आहे.
अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आणि विशेष करुन पवार कुटुंबामध्ये काय घडत होते, यावर पुस्तकामध्ये शरद पवार यांनी प्रकाश टाकला आहे. पवारांनी या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, अजित पवार यांची कृती म्हणजे पक्षशिस्तीचा निःसंशय भंग होत असल्यामुळे त्यांच्यासकट कुणाचीही गय केली जाणार नाही, या माझ्या परखड निवेदनामुळे संशयाचे धुके दुर होण्यास मदत झाली.
तसेच ''अजितचा विषय आमच्या पक्षांतर्गत कळीच्या मुद्द्याप्रमाणे कौटुंबिकही होता. पक्षाच्या नेत्यांनी या काळात अजितबरोबर सातत्याने भेटी घेतल्या. त्याने बंड केलेले असले, तरीही तो पक्षातून बाहेर पडलेला नव्हता, ही जमेची बाजू होती. अजितचे बंधू श्रीनिवास यांनाही त्याच्याशी संवाद ठेवायला सांगितला. त्यातून एक घडले, अजितची बंडाबाबतची भूमिका निवळायला सुरुवात झाली.''
''माझी पत्नी प्रतिभा आणि अजितचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. प्रतिभा राजकीय घडामोडींत कधीही पडत नाही, परंतु अजितचा विषय कौटुंबिकही होता. अजितने प्रतिभाला 'जे झाले ते चुकीचे होते आणि घडायला नको होते,' अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. आमच्यासाठी तेवढे पुरेसे होते. त्याच्या या भूमिकेमुळे भेटून, विषयावर पडदा पडला होता. अजितशी बोलल्यावर तिढा नक्की सुटेल, अशी माझी खात्री होती. झालेही तसेच.'' असे पवार यांनी या पुस्तकामध्ये म्हटले आहे.
''अपेक्षेप्रमाणे फडणवीसांचे सरकार आणि अजितचे बंड औटघटकेचे ठरले. न्यायालय ही एक रणभूमी होती, त्याच्याविषयी पक्षाच्या कुणाचाच मूड प्रतिकूल नव्हता. अजितच्या कामाचा झपाटा, सहकाऱ्यांना विश्वास देण्याची त्याची पद्धत आणि कितीही काम करण्याची तयारी यांमुळे त्याच्या नेतृत्वाबाबत विधिमंडळ सदस्यांच्या मनात सन्मानाचे स्थान आहे.''
''अजितची ही स्वकष्टार्जित कमाई आहे आणि मला याची पूर्ण जाणीव असल्याने आम्ही अजितला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. 'महाविकास आघाडी'च्या काळातल्या कोरोनाच्या साथीत अजितच्या तडफदार प्रशासकीय पद्धतीमुळे त्यालाच उपमुख्यमंत्री करण्याच्या सार्थकतेवर शिक्कमोर्तब झाले'', अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामचे कौतुकही केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.