सुशीलकुमार शिंदेंचे तिकिट कापले आणि मला रडू कोसळले : पवारांनी सांगितला हृद्य प्रसंग

शरद पवार (Sharad Pawar) आणि सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या मैत्रीला मिळाला उजाळा
Sharad Pawar-Sushilkumar Shinde
Sharad Pawar-Sushilkumar Shindesarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या मैत्रीचे बंध पुन्हा उलगडले. खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते झाला. सुशीलकुमार शिंदे या सोहळ्याला उपस्थित होते.

शरद पवार यांच्यासोबत (राष्ट्रवादीसोबत) आपली राजकीय कारकिर्द पुढे सुरू ठेवली नाही, याचे आजही वाईट वाटते. पण पवारांनी त्याविषयी कधी शब्दाने विचारले नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी या वेळी मनोगतात सांगितले. पवार यांनी सुशीलकुमारांची खंत ही तातडीने दूर केली. तुम्ही काॅंग्रेससोबत आहात. गांधी-नेहरूंच्या विचारासोबतच तुम्ही आहात. तो आमचाही विचार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यापासून दूर गेलेला नाही, अशा शब्दांत पवार यांनी त्यांना अशी सल ठेवू नका, असा सल्ला दिला.

या निमित्ताने शिंदे यांची राजकीय कारकिर्द पवार यांनी उभी केली. ते म्हणाले की महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण आणि शिंदे हे देशाचे गृहमंत्री झाले. शिंदे हे आपल्या कर्तृत्वाने तेथे पोहचले. राज्यमंत्री, मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अशी पदे त्यांना मिळाली. मात्र त्यांची राजकीय सुरवात ही खडतर झाली होती, असे पवार यांनी या वेळी सांगितले.

पवार म्हणाले की शिंदे हे खडतर परिस्थितीतून पुढे आले होते. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. पोलिस दलात फौजदार होते. तरी त्यांनी राजकारणात यावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. करमाळा या मतदारसंघासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यासाठी त्यांना सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांचे नाव काॅंग्रेसच्या यादीत होते. पण काॅंग्रेसचे तत्कालीन नेते बाबू जगजीवनराम यांनी शिंदे यांच्या नावाला विरोध केला आणि तत्कालीन विद्यमान आमदार सोनवणे यांनाच उमेदवारी मिळाली. आम्ही इंदिरा गांधींना भेटलो. पण जगजीवनराम यांना विरोध करू नका, असे त्यांनी सांगितले. आमचाही नाईलाज झाला. विमानतळावर आल्यावर मलाच अश्रू आवरेना. कारण माझ्यामुळे शिंदे यांची नोकरी गेली. त्याच काळात त्यांचे आंतरजातीय लग्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी वाढली होती. त्यांना संकटात टाकल्याबद्दल मला खंत वाटत होती., अशी आठवण पवार यांनी यानिमित्ताने सांगितली.

Sharad Pawar-Sushilkumar Shinde
मोठी बातमी : मोदींच्या पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरे येणार नाहीत... या नेत्यावर जबाबदारी

त्या वेळी मी गृह राज्यमंत्री होतो. शिंदे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांकडे वकिली करण्याचा सल्ला मी त्यांना दिला. त्या वेळी गृहराज्यमंत्र्यांकडे तडीपारीच्या केस चालत होत्या. शिंदे हे माझ्याकडे केसेस घेऊन येऊ लागले आणि त्यांची वकिली जोरात चालली, असे पवार यांनी हसतहसत सांगितले. करमाळा मतदारसंघातील आमदार सोनवणे यांचे निधन झाले. त्यासाठीच्या पोटनिवडणुकीसाठी पुन्हा शिंदे यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत आले. त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांचा राजकारणातील प्रवेश सुकर झाला. करमाळ्याचे तत्कालीन नेते नामदेवराव जगताप यांनी शिंदे यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी अनेक पदे भूषविली, याचा आनंद असल्याचे पवार यांनी सांगितले. अजून कोणती पदे राहिलीत का, अशीही हसत विचारण पवार यांनी शिंदे यांच्याकडे पाहून केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com