Pune (Shirur News) : शिरुर, खेड व पुरंदर तालुक्यातील उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray Group) गटाच्या तब्बल अडीचशे ते तीनशे महत्वाच्या पदाधिका-यांनी काल (ता.०५) मुंबईत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे तर उपस्थित होतेच, शिवाय यातील प्रमुख पदाधिका-यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री अकरा वाजता तासभर दीर्घ चर्चा ही केली.
गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या भाजपातील नेत्यांच्या आवकमध्ये, काल (ता.०५) पुणे जिल्ह्यातून बड्या पदाधिका-यांची घाऊक आवक झाली असे म्हणता येईल. कारण शिरुर, खेड व पुरंदर तालुक्यातून तब्बल २५० ते ३०० उध्दव ठाकरे गट व राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपात दाखल झाले. यात तब्बल ७ वर्षे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख राहिलेले, तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य राहिलेले राम गावडे, सन १९९५ व १९९९ अशा दोन पंचवार्षिकमध्ये भाजपाकडून शिरुरमधून विधानसभा लढलेल्या, राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाचा कार्यकाल गाजविलेल्या आणि उद्धव गटाच्या नेत्या असलेल्या जयश्री पलांडे यांचा भाजप प्रवेश झाला.
तसेच, माजी खेड तालुका प्रमुख अॅड.गणेश सांडभोर, पुरंदर तालुक्यातील निरा बाजार समितीचे विद्यमान सदस्य राष्ट्रवादीचे भानुकाका जगताप, पत्रकार प्रदीप जगताप, सासवड शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष संतोष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप देवकर आदींनी आपल्या गावोगावच्या प्रमुख पदाधिका-यांसह भाजपात पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशांमध्ये शिरुर, खेड व पुरंदर या तीन तालुक्यांतील गावोगावचे सरपंच-उपसरपंच, माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांची आजी-माजी पदाधिकारी यांचा मोठा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व पदाधिका-यांचे सनई-ताफ्याच्या गजरातील स्वागत भाजपा प्रदेश कार्यालयासाठीही नवीन होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालींदर कामठे, जुन्नरच्या नेत्या आशा बुचके, धमेंद्र खांडरे, राजेंद्र कोरेकर, आबासाहेब सोनवणे आदींसह पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुर या दोन्ही ठिकाणी आता कमळ फुलेल याचा पूर्ण विश्वास निर्माण झाल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली तर नारायण राणे यांनी सर्व प्रमुख पदाधिका-यांचे सन्मान केले.
देवेंद्र फडणवीसांचा अर्धा तासाचा विशेष संस्कार वर्ग :
पुणे जिल्ह्यातून भाजपात प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिका-यांशी चर्चा करायची आहे म्हणून, उपमुख्यमंत्री यांनी रात्री साडेदहाचे सुमारास सर्वांना भेटण्याचे निमंत्रण पाठविले. तब्बल अर्धा तास खेड, शिरुर-हवेली, आंबेगाव-शिरुर, पुरंदर विधानसभा मतदार संघाची सविस्तर माहिती व राजकीय वस्तुस्थिती त्यांनी यावेळी समजून घेतली.
दरम्यान पुढील काही दिवसांत आपण स्वत: या चारही मतदार संघाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांसाठी आता भाजपा पदाधिका-यांना काहीही कमी पडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिल्याची माहिती जळगाव दुध संघाच्या भाजपाच्या माजी संचालिका भैरवी पलांडे-इनामदार यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.