पुण्यातील कल्याणीनगर मधील पोर्श मोटार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. मुलाला वाचविण्यासाठी ससून रुग्णालयात आईने स्वत:च्या रक्ताचा नमुना दिल्याचे तपासात समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिला आज (रविवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शिवानी विशाल अगरवाल (वय 49) असे अटक करण्यात केलेल्या महिलेचे नाव आहे. कल्याणीनगर येथील अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपीचे वडील आरोपी विशाल अगरवालने ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरेशी संपर्क साधून मदत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर डॉ. तावरेने शवागारामधील शिपाई अतुल घटकांबळेला निरोप दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
घटकांबळेने डॉ. श्रीहरी हाळनोरला भेटून रक्त बदलण्याबाबत सांगितले. डॉ. तावरेच्या सांगण्यावरून डॉ. हाळनोरने मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची सिरींज कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. त्यानंतर त्याने शिवानी अगरवालच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे समोर आले आहे. ससूनमधील डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि शिपाई घटकांबळेला यापूर्वीच अटक केली आहे. गुन्हे शाखेने शिवानीला शनिवारी सकाळी वडगावशेरीतून ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली.
ससूनमध्ये दिलेल्या रक्ताचा नमुना अल्पवयीन आरोपीचा नव्हे, तर एका महिलेचा असल्याचे डीएनए चाचणीत समोर आले होते. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. त्यात शिवानी अगरवालच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठविल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी पोलिसांनीही संशय आल्याने मुलाच्या रक्ताचा नमुना औंध सरकारी रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पाठविला होता. त्यावेळी ससून आणि औंध रुग्णालयातील नमुने एकमेकांशी जुळत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.