सोमेश्वरनगर : बनावट दस्ताऐवज केल्याच्या संशयावरून सोमेश्वर कारखान्याचे (Someshwar sugar Factory)माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे (Shahajirao Kakade)यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा भाचा अभिजित बापुसाहेब देशमुख (वय ४३) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत फिर्याद दिली होती.
२०११ मध्ये भाचीच्या शेअर्सच्या दहा हजार रूपये रकमेचा अपहार केल्याच्या आणि १९९४ मध्ये बहिणीच्या जमिनीचा बनावट दस्ताऐवज केल्याच्या संशयावरून सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिजित यांच्या बहिणी संगीता बापूसाहेब देशमुख (ऐश्वर्या महेंद्रसिंह जाधवराव), मनिषा बापूसाहेब देशमुख (मनिषा राजेंद्र शिंदे), अनिता बापूसाहेब देशमुख (अनिता प्रमोद बर्गे) या तिघींच्या नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात प्रत्येकी पाच हजार रूपयांचे शेअर्स होते. त्यापैकी मनिषा व अनिता यांच्या नावचे दोन्ही शेअर्सचे दहा हजार रूपयांचे असलेले शेअर्स शहाजीराव काकडे यांनी अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधांचा वापर करत १६ नोव्हेंबर २०११ रोजी रोख स्वरूपात काढून घेतले. दोघींची बँकेत खाती असतानाही ती नसल्याचे भासविले असल्याचे अभिजित देशमुख यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.
अभिजित यांच्या आई सुमन बापूसाहेब देशमुख यांच्या नावे निंबुत येथे असलेली गट क्रमांक १६७ मधील ३.४४ हेक्टर जमीन २३ मार्च १९९४ रोजी बारामती निबंधक कार्यालयात बनावट दस्त करून विकली. ती जमीन आईच्या परस्पर करण मेघराज काकडे व अमेय सुरेश काकडे यांच्या नावे करून आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद दिली आहे. तपास पोलिस फौजदार योगेश शेलार करत आहेत.
शहाजी काकडे म्हणाले, ''ही तक्रार राजकीय कटकारस्थान आहे. माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा उद्देश यामागे आहे. या जुन्या काळातून उकरून काढलेल्या वादाची बाब न्यायप्रविष्ट असल्याने अधिक काही बोलू शकत नाही. लवकरच सत्य समोर येईल यात शंका नाही,'' राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे याचेच हे द्योतक असल्याची प्रतिक्रिया शहाजीराव काकडे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.