SP अभिनव देशमुखांनी शब्द पाळला; उद्योजकांच्या संघटनेस दिले दिवाळी गिफ्ट!

महिनाभरात पाचव्या औद्योगिक गुन्हेगारास करंदीत पकडले
Dr. Abhinav Deshmukh
Dr. Abhinav DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : तुम्ही फक्त त्रिसुत्री पाळा; पुणे-नगर रोड गुन्हेगारमुक्त करून दाखवतो, असा शब्द पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ४०० उद्योजकांच्या संघटनेला डीसीसीआय (Deccan Chember of Commerce & industries) सणसवाडीत येऊन दिला होता. तसेच पुढच्या बैठकीत आज मांडलेल्या प्रश्नांवर कार्यवाही झालेली दिसेल, असे त्यांनी त्या बैठकीत सांगितले होते. त्याच्या १० दिवसानंतर पाचवा औद्योगिक खंडणीखोर सागर वरपे याला शिक्रापूर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात जेरबंद केले. एका कंपनीला ती वापरत असलेला रस्ता बेकायदेशीर असल्याचे सांगून वरपे हा तब्बल २० लाखांची खंडणी गेल्या ५ वर्षांपासून त्या कंपनीस मागत होता. त्याच्या भीतीमुळे कंपनीने आजपर्यंत तक्रार केली नव्हती. चार दिवसांपूर्वीच चौथा औद्योगिक गुन्हेगार पकडला होता. (SP Abhinav Deshmukh kept his word by arresting the fifth industrial criminal)

शिरूर तालुक्यातील करंदी येथील संकल्प इंजिनिअरींग कंपनी वापरत असलेला सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता हा बेकायदेशीर आहे, असे सांगून त्यांच्या विरोधात महसूल विभागाकडे तक्रार करत कारवाई करायला लावतो, असे म्हणून वेळोवेळी खंडणी मागितल्याची तक्रार देण्यात आली होती. याबाबत कंपनी व्यवस्थापन दहशतीत होते. मात्र, डॉ. देशमुख यांनी डीसीसीआयच्या बैठकीत ४०० कंपन्यांच्या प्रतिनिधींना आश्वासित केले, त्यानंतर कंपन्यांकडून तक्रारी दाखल करणे सुरु झाले. संकल्प इंजिनिअरींगच्या तक्रारीनंतर २०१५ पासून आत्तापर्यंत विविध प्रकारचे ५ गुन्हे दाखल असलेला पाचवा फरार आरोपी सागर सुनील वर्पे ह्याला करंदी येथूनच पकडण्यात आले.

दरम्यान, जिल्हा पोलिसांनी आत्तापर्यंत भूषण गायकवाड (कोंढापुरी), वैभव आदक, आनंद कसबे (दोघेही रा. करंदी, ता, शिरूर), कौस्तुभ होळकर (कोरेगाव भीमा), (करंदी) यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. त्यानंतर सागर वरपे ह्या पाचव्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. पुढील काही वर्षे यातील एकही जण बाहेर येणार नाही, एवढी भक्कम बाजू आम्ही न्यायालयापुढे मांडल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

आतिरीक्त पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागिय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. पठारे, पोलिस नाईक विकास पाटील, अमोल नलघे, जयराज देवकर, निखिल रावडे, लखन शिरसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एकाच महिन्यात ६ औद्योगिक गुन्हेगार जेरबंद

गुन्हेगारी प्रवृत्ती संपविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांचे पाठबळ मिळालेली डीसीसीआय सध्या पोलिस आणि कंपन्या यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने समन्वय घडवून आणत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. देशमुखांनी एकाच महिन्यात ६ औद्योगिक गुन्हेगार जेरबंद करून दाखविले आहेत. डीसीसीआयला तक्रारी कळविल्या की, पारदर्शकपणे कारवाया होतात, हा संदेश ४०० कंपन्यांपर्यंत गेला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांबरोबरच आता डीसीसीआयचीही दहशत निर्माण झाल्याची प्रतिक्रिया पुणे-नगर रोड औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com