Raj Bhavan Maharashtra News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. सत्तासंघर्षाची ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची प्रत देण्यास राज्यपाल कार्यालयाने (राजभवन) नकार दिला आहे.
राजभवनने दिलेले हे कारण व केलेला अजब दावा धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या राजीनाम्याची प्रत माहिती अधिकारात मागविलेले बारामती (जि.पुणे) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी `सरकारनामा`ला दिली.
गेल्या महिन्यात १२ तारखेला यासंदर्भात `आरटीआय`कायद्यान्वये अर्ज करीत माहिती मागितली होती. त्याला परवा (ता.८) राज्यपाल कार्यालयातील जनमाहिती अधिकारी विक्रम निकम यांनी उत्तर दिले.त्यात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणामध्ये तत्कालीन राज्यपालांनाही पक्षकार केले गेले असल्याचे सांगत ही माहिती देण्यास नकार दिला.
दरम्यान, ठाकरे यांनी फक्त तोंडी मुख्यमंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याचे ऐकिवात होते. त्यामुळे हा राजीनामा राजभवन कार्यालयात राज्यपालांकडे आहे का,असल्यास त्याची साक्षांकित प्रत मिळावी म्हणून माहिती अधिकारात मागणी केली होती. मात्र,त्यावर मिळालेल्या राजभवनच्या उत्तरातून त्यांच्याकडे असा राजीनामा आहे की नाही हा प्रश्न पडला आहे, असे यादव म्हणाले.
यापुर्वी मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती त्यावेळेस राज्य सरकारने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असूनही ती दिली होती,याकडे त्यांनी लक्ष वेधले.त्यामुळे ठाकरे प्रकरणात माहिती न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करुन कोणाच्या दबावातून ही माहिती नाकारली जात आहे का अशी शंका त्यांनी उपस्थित केली.